नागपूर: वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चा भंग केल्याप्रकरणी अभिनेत्री छाया कदम यांना वनखात्याने चौकशीसाठी बोलावले आहे. सोमवार, पाच मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता छाया कदम यांना मुंबई येथील वनविभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.
अलीकडेच अभिनेत्री छाया कदम यांनी एका प्रसिद्धी माध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जंगलातील हरीण, रानडुक्कर, घोरपड, साळींदार हे संरक्षित वन्यजीव खाल्ल्याचे सांगितले. हे प्राणी संरक्षीत वन्यजीव असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चा त्यांनी भंग केला आहे.
त्यामुळे या प्रकरणात मुंबई वनक्षेत्रपाल कार्यालयातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.व्ही. भोईर यांनी अभिनेत्री छाया कदम यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२२) कायद्याचा भंग होत असल्याने नोटीस बजावली आहे. दरम्यान, छाया कदम यांची मुलाखत प्रसारित होताच सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे (शहा) यांनी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम वन्यजीव विभाग बोरिवली, मुंबई यांच्याकडे पत्र लिहून तक्रार दाखल केली.
या तक्रारीत त्यांनी वन्यजीवांचे मांस खाल्ल्याप्रकरणी छाया कदम यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२२) अंतर्गत संरक्षित प्राण्यांची शिकार करणे, बाळगणे, मांस खणे हा मोठा व अजामीन पात्र गुन्हा आहे. त्यामुळे छाया कदम यांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यांनी कोणत्या जंगलात हे प्राणी मारले, किंवा हे मांस कुणी पुरवले, सदर तस्करी करणाऱ्या व्यक्तींचे पाळेमुळे शोधणे गरजेचे आहे. यात अजून इतर अभिनेते, अभिनेत्री सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे छाया कदम यांना ताबडतोब चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावे व त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२२) अंतर्गत् गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक मुंबई सुनीश कुंज्यू , मानद वन्यजीव रक्षक मुंबई पवन शर्मा , डॉ संतोष पाटील संभाजीनगर या व्यतिरिक्त अनेक निसर्ग प्रेमी संस्था यांनी केली. तसेच कायदेशीर कारवाईबाबत मागणी केली आहे. दरम्यान, आता अभिनेत्री छाया कदम सोमवारी वनविभागाच्या कार्यालयात हजर होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याआधीही त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.