नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाणारे बाबासाहेब आंबेडकरही संघाच्या शाखेत आले होते, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यम शाखेने केला. त्यानंतर आता महात्मा गांधी यांनी दिल्लीतील संघ शाखा आणि संघाच्या एका शिबीरला भेट दिल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दावा केला आहे.
संघाच्या माध्यम शाखेने २ जानेवारी १९४० रोजी आंबेडकर यांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका शाखेला भेट तर दिलीच, शिवाय तेथे उपस्थित स्वयंसेवकांनाही संबोधित केले, असा दावा केला होता. त्यावरून वाद निर्माण झाला होता. आता आंबेकर यांनी, १९३७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिविर (शिबिर) भेटीदरम्यान गांधीजींनी हेडगेवार यांच्याशी संवाद साधला होता. तसेच महात्मा गांधींनी १९४७ मध्ये दिल्लीतील वाल्मिकी मंदिरातील एका ‘शाखा’लाही भेट दिली होती, असा दावा केला आहे.
महात्मा गांधी आणि डॉ. केशव हेडगेवार यांची तुलनेची गरज नाही. या दोन्ही महापुरुषांनी राष्ट्र उभारणीचे कार्य केले, असे प्रतिपादन आंबेकर यांनी केले. ते डॉ. माधव पात्रिकर लिखित डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी एक दर्शन लेखक या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते. उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. यावेळी गांधी-विनोबा विचारांचे अभ्यासक डॉ. अपरुप अडावतकर, प्रकाशक चंद्रकात लाखे लाखे प्रकाशन उपस्थित होते.
आंबेकर म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तिसाठी झालेला प्रत्येक प्रयत्न श्रद्धेय आहे. महात्मा गांधी यांनी अहिसेंच्या मार्गाने समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देश स्वातंत्र्यासाठी कार्य केले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून कार्य केले. डॉ. हेडगेवार यांनी देशाला मजबूत हिंदू संघटना स्थापन केली. सगळेच हिंदू समाजात एकता स्थापित करण्याचा प्रयत्न करीत होते.
महात्मा गांधी आणि डॉ. हेडगेवार यांनी रामराज्यांची कल्पना मांडली. राष्ट्र म्हणून एकसंघ राहीला पाहिजे यासाठी दोघांचेही प्रयत्न होते. त्यामुळे गांधींनी भारताच्या फाळणीला विरोध केला होता. मात्र, भारताची फाळणी हिंदुत्व कमकुवत होते म्हणून झाले की, नेतृत्व कमकुवत होते म्हणून झाले हा चर्चेचा विषय आहे आणि राहील, असे ते म्हणाले.
महात्मा गांधी आणि डॉ. केशव हेडगेवार यांच्यात २० वर्षांचे म्हणजे एका पिढीचे अंतर होते. तत्कालिन परिस्थितीनुसार महापुरुष त्यांचे कार्य करीत असतात. आजच्या परिस्थितीनुसार त्यांच्या कार्याचे आकलन करणे त्यांच्या अन्याय ठरले. त्यामुळे इतिहासात काय झाले ते न बघता वर्तमान आणि भविष्याचा वेध घेतला पाहिजे. समाजमाध्यमावर महात्मा गांधींबद्दल चुकीची माहिती प्रसुत केली जाते आहे. तीच खरी देखील मानली जात आहे. हे टाळून मूळ लेखन वाचून महात्मा गांधी यांना समजून घ्यावे, असे आवाहन अपरुप अडावतकर यांनी आवाहन केले.