scorecardresearch

तीन कोटींच्या खंडणीसाठी क्रिकेट बुकीच्या अपहरणाचा प्रयत्न

अपहरणकर्त्या चौघांचा शोध घेण्यासाठी तीन शोध पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली.

तीन कोटींच्या खंडणीसाठी क्रिकेट बुकीच्या अपहरणाचा प्रयत्न
सांकेतिक फोटो / लोकसत्ता

चंद्रपूर : ऑनलाईन क्रिकेट सट्टा व जुगाराचे रॅकेट चालविणाऱ्या प्रदीप गंगमवार व त्याचा मित्र राजेश झाडे या दोघांचे चौघांनी मिळून सरताज या मित्राच्या मदतीने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन कोटींच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले.दरम्यान, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गंगमवार व झाडे यांनी सुटका करून घेण्यात यश मिळवले. अपहरणकर्त्या चौघांचा शोध घेण्यासाठी तीन शोध पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली.

महाकाली वार्ड चंद्रपूर येथील रहिवासी प्रदीप गंगमवार व  राजेश झाडे हे दोघेही लहापणीचे मित्र असून या दोघांवर जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. ऑनलाईन क्रिकेट सट्टा प्रकरणी गंगमवार यांना गडचिरोली पोलिसांसोबतच चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील पोलिसांनी अनेकदा अटक केली आहे. पोलिसांनी जुगार खेळताना पकडू नये यासाठी हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी जुगार खेळतात. जुगाराच्या या छंदात त्यांची ओळख खुनाच्या आरोपात १० वर्षे शिक्षा भोगलेला सरताज हाफिज यांच्यासोबत झाली होती. गंगमवारजवळ असलेली चारचाकी त्यांना चालवता येत नसल्याने त्यांचा बालपणाचा मित्र राजेश झाडे त्यांच्या वाहनाचा सारथी होता. १५ ऑगस्टला चंद्रपुरात मुसळधार पाऊस असल्याने गंगमवार आपल्या घरी होते. त्याचवेळी राजेश याने बाहेर जुगार खेळायला जाऊया, असे फोनवरून सांगितले. मात्र, त्याचवेळी सरताज यांनी कॉल करून मलाही जुगार खेळायचा आहे असे सांगितले.

हेही वाचा >>> गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंचा ‘ईमेल हॅक’ ; संबंधितांना फसविण्याचा प्रयत्न

पावसात तिघेही जुगार खेळण्यासाठी निघाले. तुकुमला पोहचल्यावर गाडी पार्क करीत असताना अचानक ४ जणांनी गाडीत प्रवेश करीत त्यांना चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवीत धमकावले. बंदुकीचा धाक दाखवत गंगमवारला ३ कोटी मागितले. मात्र, पैसे नसल्याने त्यांनी हतबलता दाखवली असता राजेश झाडे मध्येच बोलल्याने एकाने त्याच्या कानशिलात लगावली.

गंगमवार यांनी ५० लाख देण्याची तयारी दाखवली. यासाठी त्यांनी यवतमाळ येथील मित्राला फोन केला. मात्र, पैसे १६ ऑगस्टला मिळेल असे सांगितले असता त्या ४ जणांनी वाहन मूल मार्गे सिंदेवाही, नागभीड व उमरेड मार्गे थेट नागपूरला आणले. वाटेत उमरेडला पोहचल्यावर चार पैकी १ त्याठिकाणी उतरला, नंतर गाडी पहाटे ३ च्या सुमारास मोमीनपुरा येथे दाखल झाली. तिघांपैकी एकाला सिगारेटची तलब आली. गाडी थांबविण्यात आली. याचा फायदा घेत राजेश झाडे हा गाडीच्या खाली उतरत वाचवा वाचवा ओरडू लागला. नागरिक राजेशकडे धावले. नागरिकांची गर्दी जमा होत असताना आरोपीने राजेशला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी मोमीनपुरा येथे पोलीस असल्याने त्यांनी राजेशला सोडले. अपहरणाचा कट फसला असे वाटताच आरोपींनी पळ काढला. त्यांच्यासोबत सरताजनेही पळ काढला. पोलिसांनी राजेश व प्रदीपला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. गंगमवारच्या तक्रारीची नोंद घेत गुन्हा दाखल केला. अपहरण व खंडणीच्या कटामागे सरताज असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempted kidnapping of cricket bookie for ransom of 3 crores zws

ताज्या बातम्या