भंडारा : भंडारा नगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते आमदार डॉ. परिणय फुके यांनी काही दिवसांपूर्वी केला होता एवढेच नाही तर भंडारा नगर परिषदेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार फुके यांनी जाहीरपणे तक्रार केली होती. या तक्रारीची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी आता मुख्याधिकारी करण चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. करण चव्हाण यांच्या जागी तुमसर नगर परिषदेतील मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या भंडारा नगर परिषदेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर चव्हाण यांच्या विरोधात निलंबन कारवाई देखील होऊ शकते, असे पुरावे समोर येत असल्याची माहिती आहे.

नगरपरिषदेतील अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. यासंदर्भात भंडारा आणि पवनी येथील मुख्याधिकाऱ्यां बाबत आमदार परिणय फुके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. फुके यांनी दोन नगरपरिषदेतील भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यामुळे सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी भंडारा आणि पवनीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आता याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांना पदावरून दूर करण्यात आली आहे.

चौकशीला सुरुवात झाल्यानंतर करण चव्हाण हे हाताखालील कर्मचाऱ्यांवर दबाव आणू शकतात. भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे नगर विकास विभागाने तातडीने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर आता नगरपरिषदेतील संपूर्ण भ्रष्टाचाराच्या चौकशीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे नगरपरिषदेमधील प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार करतानाच एक वरदहस्त होता. मात्र हा वरदहस्त असलेल्या व्यक्तीही देखील आता चव्हाण यांना वाचवू शकणार नाही असे चित्र आहे.

भंडारा नगर परिषदेनंतर आता पवनी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई होते? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच करण चव्हाण यांच्या विरोधात सुरू झालेल्या कारवाईच्या क्रमामुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. या चौकशीचे धागेदोरे करण चव्हाण यांच्या माध्यमातून कोणापर्यंत पोहोचतात? याची प्रतीक्षा आता सर्वांना आहे.