नागपूर : लोकसभा निवडणुकीतील एकाकी ठरल्याने झालेली भाजपची पिछेहाट आणि संघाच्या बळावर विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश यापार्श्वभूमीवर संघाने आता भाजपला प्रत्येक निवडणुकीत मदत करण्याचे ठरवले आहे.

त्यातून रविवारी नागपुरातील रेशीमबाग परिसरामधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भाजप कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या बैठकीमध्ये संघटन वाढवण्यासह आगामी निवडणुकांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये मंत्री भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन लोकांच्या समस्या ऐकतील अशा सूचना देण्यात आल्या. याचाच भाग म्हणून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी गणेशपेठ भाजप कार्यालयात शहर आणि नागपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत समस्या जाणून घेतल्या. या माध्यमातून भाजप लोकांपर्यंत जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचे नियोजन करत आहे.

संघ परिवारातील सर्व संघटनांची विशिष्ट कालावधीनंतर बैठक होत असते. बैठकीत भाजपच्या विदर्भातील सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते. यानंतर फुंडकर यांनी तातडीने सोमवारी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत विविध समस्या ऐकूण घेतल्या. या बैठकीदरम्यान फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना आश्वासन दिले की, सर्व समस्या सरकार आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत सोडवल्या जातील. आता मुंबईत येण्याऐवजी, सरकारचे सर्व अधिकारी आणि मंत्री त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध असतील. याआधी, भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ओळख करून देताना फुंडकर यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी मंत्रालयाच्या प्रशासनाच्या कार्यशैलीला गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, माजी आमदार विकास कुंभारे, राजू पोतदार, सुधीर देऊळगावकर, गुड्डू त्रिवेदी, राम आबुलकर, बाल्या बोरकर, विष्णू चगडे, अश्विनी जिचकार, शिवानी दाणी, चेतन कायरकर, प्रगती पाटील, चंदन गोस्वामी, माजी अध्यक्ष भोजराज भोसले आदींची उपस्थिती होती.