बुलढाणा: कष्टाने पिकविलेल्या सोयाबीन ला मिळालेल्या कमी भावाने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आज खामगावात स्वतःसह सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला. हाती कोयता आणि ‘गन’ सदृश्य शस्त्र घेऊन त्याने आपला संताप जहाल पद्धतीने बोलून दाखविला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर घटनास्थळी निर्माण झालेला तणाव निवळला.

खामगाव कृषी उत्पन्न समितीत सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने या शेतकऱ्याने रुद्रावतार धारण केला. सोयाबीन खाली सांडून देणाऱ्या या शेतकऱ्याने अंगावरील शर्ट भिरकावून दिला. या युवा शेतकऱ्याच्या पॅन्ट मध्ये ‘गन’ सदृश्य शस्त्र खोचलेले होते. हाती धारदार कोयता व नंतर ‘गन’ घेऊन त्याने शासनाचा निषेध केला. ‘शेतकऱ्याच्या कष्टाच्या मालाला भाव मिळविण्यासाठी आता हत्यारच राहिले आहे’ ,असे जोरजोरात ओरडून त्याने सांगितले.

हेही वाचा… विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात बनवली ७ हजार किलोची खिचडी; मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून विश्वविक्रम!

खामगाव बाजार समितीत तरी चांगला भाव मिळेल म्हणून मी सोयाबीन विक्रीसाठी आणलं. पण भाव मिळालाच नाही. मी पिंपळखुटा (ता व जिल्हा अकोला) येथील रहिवासी रवी महानकर असून शंभर क्विंटल सोयाबीन विकली, पण खर्च भरून निघेल इतकाही भाव मिळाला नाही’ असे माध्यमांशी बोलताना त्वेषाने त्याने सांगितले.मला एकरी ३ क्विंटलच सोयाबीन निघाले. सर्वांचीच अशी वाईट अवस्था असल्याचे त्याने सात्विक संतापाने सांगितले. सोयाबीनला किमान ६ हजार प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे अशी जोरकस मागणी त्याने केली. यावेळी बघ्यांची एकच गर्दी जमली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान खामगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शेतकरी महानकर यांना ताब्यात घेत शस्त्रे जप्त केली. शेतकऱ्यांच्या हातात दिसत असलेली पिस्तूल सदृश्य वस्तू एअर गन असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरू आहे.