चंद्रपूर: मध्य भारतातील महाराष्ट्र, ओडिसा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यातील १९ व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालकांची प्रादेशिक परिषद १ व २ जुलै रोजी चंद्रपूर येथील वन अकादमी येथे पार पडली. या दोन दिवसीय परिषदेत व्याघ्र संवर्धनातील आव्हाने, व्यवस्थापनातील प्रभावी उपाययोजना आणि व्याघ्र अधिवास टिकवण्यासाठी व सुधारण्यासाठी उपाययोजना तसेच वाघांचे वाढते मृत्यु व अखिल भारतीय व्याघ्र गणना (एआयटीई) २०२६ ची तयारी यावर सखोल चर्चा करण्यात आली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रोजेक्ट टायगरचे अतिरिक्त महासंचालक, एनटीसीएचे सदस्य सचिव डॉ. गोबिंद सागर भारव्दाज, एनटीसीए (वन) महानिरीक्षक डॉ. संजयन कुमार, एनटीसीए सदस्य राहुल भटनागर, मध्य भारत क्षेत्र एनटीसीए (वन) सहायक महानिरीक्षक नंदकिशोर काळे उपस्थित होते. मंगळवार १ जुलै रोजी पहिल्या दिवशी पार पडलेल्या तांत्रिक सत्रांमध्ये विविध व्याघ्र प्रकल्पांनी डेटा सादर केला.

अखिल भारतीय व्याघ्र गणना (एआयटीई) २०२६ ची तयारी, फेज-४ मॉनिटरिंग प्रोटोकॉल्सची अंमलबजावणी, व्याघ्र मृत्यू अहवालांची स्थिती, आणि व्याघ्र संवर्धन आराखड्यांची (टीसीपीएस) प्रगती यावर चर्चा झाली. स्पर्श पोर्टलद्वारे वार्षिक कार्ययोजना (एपीओएस) सादर करणे, स्वेच्छेने होणारे व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन, आणि व्यवस्थापन कार्यक्षमता मूल्यमापन (एमईई) यावरही विचारमंथन झाले. काही व्याघ्र प्रकल्पांनी तण वर्गीय वनस्पती नियंत्रण व कुरण व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.

तसेच सर्व प्रतिनिधींना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष कुरण व्यवस्थापन व अधिवास सुधारणेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. बुधवार २ जुलै रोजी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात १९ व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक व उपसंचालक यांनी आपले अनुभव सादर केले. त्यांनी स्थानिक आव्हाने, नवकल्पना आणि अधिवास-विशिष्ट उपाययोजना यांची माहिती दिली. या सत्रामुळे परस्पर ज्ञानवृद्धी झाली आणि अनुकूल व्यवस्थापनासाठी यशस्वी प्रारूप समोर आले.

दोन दिवसीय परिषदेची सांगता प्रोजेक्ट टायगरचे अतिरिक्त महासंचालक, एनटीसीएचे सदस्य सचिव डॉ. गोबिंद सागर भारव्दाज यांच्या भाषणाने झाली. त्यांनी आंतरराज्य समन्वय बळकट करण्याचे, वन्यजीव गुन्हेगारी रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सुधारण्याचे, वैज्ञानिक व तंत्रज्ञानाधारित निरीक्षण प्रणाली अंगीकारण्याचे आणि क्षेत्रीय पातळीवर विकेंद्रीत अंमलबजावणीस प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दीर्घकालीन अधिवास सुधार, आक्रमक वनस्पती नियंत्रण, शाश्वत कुरण विकास आणि समुदाय-समावेशक उपाययोजनांद्वारे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परिषदेत सहभागी सर्व प्रतिनिधींनी अटल बिहारी वाजपेयी वनौद्यान, विसापूर येथे भेट दिली. ही प्रादेशिक बैठक व्याघ्र संवर्धनासाठी राज्यांच्या पलीकडे जाऊन समन्वय, नवोपक्रम आणि ज्ञान-संवाद वाढवणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली.