लोकसत्ता टीम

चंद्रपूर : हा “वारां”चा आणि “वाघां”चा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार आमचे नेते आहेत. वडेट्टीवार असो की जोरगेवार, कुठलाही “वार” असला तरी आम्ही स्वागत, व सन्मान करतोच करतो. ‘वार’ आडनाव आले की आमचे हात जोडूनच असतात. कारण आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे “हेडगेवार” यांचे अनुयायी आहोत अशी टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वडेट्टीवार यांना भाजपात या मंत्री करू अशी थेट ऑफरच दिली.

माजी मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात आज काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर चांगल्या कोट्या केल्या. या कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित होते. याची सर्वत्र चर्चा होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा असून सहा पैकी तीन आमदार वार आहेत.वडेट्टीवार यांना कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी फोन केला तेव्हा त्यांनी जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही याबद्दल बोलतांना मुनगंटीवार किंवा जोरगेवार या दोन पैकी एक जण मंत्री पाहिजे होते असे सांगितले. मात्र, तिसऱ्या वारासाठी मंत्रीपद आहे आणि तिसरे वार वडेट्टीवार आहे असेही जोरगेवार बोलून गेले. वारांनी मंत्री व्हावे ही इच्छा आहे असेही जोरगेवार म्हणाले.

आणखी वाचा-चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’

पालकमंत्री कोण अशीही चर्चा जिल्ह्यात सूरू आहे तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशीही विनंती जोरगेवार यांनी केली. यावेळी बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, आमदार जोरगेवार हुशार आहे. जोरगेवार बाजूची खुर्ची घेण्यात हुशार आहे. काम कसे करायचे हे आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शिकलो.फडणवीस साहेब तुम्ही देशाच नेतृत्व कराल तेव्हा कोणत्या ना कोणत्या वारांना सोबत ठेवा, आता जोरगेवार यांनी आपला नंबर पहिले लावला आहे आणि ते मला म्हणत आहेत की येता का दुपट्टा आणू का, मी मजा मारतो, आमदार होण्यासही जोरगेवार यांनी आमच्याकडून दुपट्टा घातला व आता मंत्री होतांनाही दुपट्टा आमच्याच कडून घालतो म्हणतात, मी फडणवीस यांना व्यक्तीगत भेटील तेव्हा जे काही मागायचे ते मागेल. मात्र आम्ही फोनवर बोलला त्या गोष्टीही जोगेवार यांनी येथे सांगून टाकल्या असेही वडेट्टीवार म्हणाले.

यानंतर मला फोन टेप करून ठेवावे लागेल. नाही तर जे बोललो नाही तेही सांगायचे. जोरगेवार यांचा मंत्री पदासाठी नंबर लागत असेल तर चांगले आहे असेही वडेट्टीवार म्हणाले . आमच्या सदिच्छा जोरगेवार यांच्या सोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्यावर सोबत आहे. फडणवीस यांचे कर्तत्वच असे आहे की त्यांना माता महाकाली सोबतच सर्वच देवींचा आशिर्वाद आहे. यावेळी फडणवीस यांनीही वडेट्टीवार यांना मंचावरच थेट भाजपात या अशी ऑफर दिली. वडेट्टीवार हे आमचे मित्र आहेत असेही फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा-नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपात आता कोल्ह्यांची संख्या अधिक – वडेट्टीवार

पत्रपरिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप प्रवेशाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी वडेट्टीवार यांना विचारले असता, भाजपात जायचे असते तर निवडणूकीच्या पहिलेच गेलो असतो, मात्र आम्ही कॉग्रेसमध्येच ठिक आहे. भाजपात आता कोल्ह्यांची संख्या अधिक झाली आहे. सर्व वाघांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे आणि कोल्हे सर्व एकत्र येत आहेत असेही वडेट्टीवार मिश्किलपणे म्हणाले.