अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे. नैऋत्य मोसमी पावसाने राज्यातून निरोप घेतला. मात्र, १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची उभे पिके पाण्यात वाहून गेली असून अतोनात नुकसान झाले. सध्या मोसमी पावसाने राज्यात निरोप घेतला आहे. पूरपरिस्थितीतून सर्व जण सावरत असतांना आता पुन्हा एकदा अवकाळीचे संकट निर्माण झाले. सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते.

या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

‘आपत्ती धोके निवारण दिना’निमित्त प्रतिज्ञा

संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस ‘आपत्ती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात मी सक्रिय सहभाग नोंदवून,आपत्तीपासून माझी, माझ्या परिवाराची, माझ्या समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन.आपत्ती धोके कमी करणाऱ्या समुदाय-आधारित उपक्रमांमध्ये मी सक्रिय सहभाग घेईन. माझ्या परिवारात व समाजात आपत्तीबद्दल जनजागृती करून, त्यासंबंधी पूर्वतयारी कशी करावी याविषयी सदैव प्रयत्न करीन. राज्यातील आपत्तीप्रवण भागात जिवीत, वित्त व पर्यावरण विषयक हानी होऊ नये म्हणून सदैव कटिबद्ध राहीन,’ अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी आपत्तीपूर्व तयारी, जनजागृती आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.