गडचिरोली : कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून राज्य राखीव बलाच्या जवानाने शेजारी राहणाऱ्या सहकाऱ्याची चाकू भोसकून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली.सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ मुख्यालय परिसरात ही घटना उघडकीस आली. सुरेश मोतीलाल राठोड (३०) असे हत्या झालेल्या जवानाचे नाव असून याप्रकरणी आरोपी जवान मारोती सातपुते(३३) याला अटक करण्यात आली आहे. दोघेही जवान यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
देसाईगंज शहराजवळील विसोरा येथे राज्य राखीव बल गट क्रमांक १३ चे जिल्हा मुख्यालय आहे. या परिसरातील वसाहतीत मृतक सुरेश राठोड आणि आरोपी मारोती सातपुते शेजारी वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून दोघांच्याही कुटुंबात कचरा टाकण्यावरून आणि इतर कारणावरून वाद सुरू होते. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दोघांमधील वाद विकोपाला गेला. आरोपी मारोती याने घरातून चाकू आणून सुरेशवर वार केले. यात सुरेशचा मृत्यू झाला.
हेही वाचा >>>“एक शरद पवार म्हणजे शंभर अजित पवार तयार करणारी फॅक्ट्री”, प्रदेश सरचिटणीसांसह शंभर पदाधिकाऱ्यांचा ताफा मुंबईकडे
या घटनेमुळे राज्य राखीव पोलीस बलामध्ये एकच खळबळ उडाली. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनूस इनामदार यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.