scorecardresearch

नागपूर : नादुरुस्त मीटरही बदलले जात नाही, ग्राहकांचा कर्मचाऱ्यांवर रोष, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा आरोप

मीटर नसल्याने अधिकारी ग्राहकांना खासगी दुकानातून मीटर खरेदी करायला सांगतात, तर दुकानदार अव्वाच्या सव्वा दर आकारून ग्राहकांची लूट करतात.

customer angry on Mahavitaran for faulty meter in Nagpur
नादुरुस्त मीटरही बदलले जात नाही, ग्राहकांचा कर्मचाऱ्यांवर रोष, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा आरोप

महेश बोकडे

नागपूर : महावितरण राज्यभरात मागेल त्याला नवीन मीटर देत असल्याचे सांगते. परंतु नवीन वीज जोडणी मागणाऱ्या अनेक ग्राहकांना मीटर उपलब्ध नसल्याचे सांगत बाहेरून घ्यायला लावले जात आहे. प्रत्यक्षात नादुरुस्त मीटरही बदलून दिले जात नसल्याने वीज कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे, असा आरोप महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला आहे.

फेडरेशनकडून महावितरणला सर्कल स्तरावर वीज मीटर उपलब्ध करण्यासाठी निवेदन दिले गेले. त्यात फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कृष्णा भोयर म्हणाले, महावितरणकडून गेल्या वर्षभरात मागणीच्या तुलनेत मीटरचा पुरवठा झाला नाही. त्याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांकडून गरजेनुसार मीटरची खरेदी प्रक्रिया वेळेवर न होणे हे आहे. मीटर नसल्याने अधिकारी ग्राहकांना खासगी दुकानातून मीटर खरेदी करायला सांगतात, तर दुकानदार अव्वाच्या सव्वा दर आकारून ग्राहकांची लूट करतात.

जोपर्यंत नवीन मीटर मिळणार नाही, तोपर्यंत देयक भरणार नसल्याचे ग्राहक स्पष्ट सांगतात. यावेळी ग्राहकांची समजूत काढतानाही कर्मचाऱ्यांची दमछाक होते. महावितरणने फेडरेशनच्या मागणीनंतर लक्षावधी मीटरची खरेदी प्रक्रिया करणे अभिनंदनीय आहे. परंतु हे मीटर तातडीने सर्कल स्तरावर उपलब्ध करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणीही भोयर यांनी महावितरणकडे केली.

महावितरण काय म्हणते?

महावितरणकडे नवीन वीजमीटरचा तुटवडा नाही. तातडीच्या उपाययोजनांमुळे येत्या सप्टेंबर २०२२ पर्यंत १५ लाख नवीन सिंगल फेज वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. सध्या एप्रिलअखेर १ लाख ३१ हजार ८०२ वीजमीटर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध होते. मे महिन्यापासून आतापर्यंत आणखी २ लाख ५० हजार नवीन मीटरचा पुरवठा झाला. सोबतच कार्यादेश दिलेल्या ७५ हजार नवीन थ्री फेजच्या मीटरचा पुरवठा देखील सुरू आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध आहेत. याशिवाय जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी ३ लाख २५ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Customer angry on mahavitaran for faulty meter in nagpur asj

ताज्या बातम्या