Cyclone Ragasa Impact Maharashtra नागपूर : मान्सूनचे वारे परतीला लागले असले तरीही परतीचा प्रवास शांतपणे होणार नाही. बऱ्याच भागांमध्ये पाऊस परतताना धुमाकूळ घालणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात मुसळधार बरसणारा पाऊस आता धुमाकूळ घालत आहे आणि मराठवाड्यात या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. पॅसिफिक महासागरात तयार झालेले चक्रीवादळ त्यासाठी कारणीभूत ठरले असून बंगालच्या उपसागरावर देखील त्याचा परिणाम झाला आहे.

त्यामुळे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली आणखी तीव्र होत असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. हा अंदाज खरा ठरल्यास राज्यात आणि प्रामुख्याने विदर्भात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पॅसिफिक महासागरात ‘टायफून’ हे चक्रीवादळ घोंगावत आहे. या चक्रीवादळाला ‘रागासा’ असेही म्हटले जाते आणि यावर्षीचे ते जगातील सर्वाधिक तीव्र वादळ आहे. त्याचा परिणाम बंगालच्या उपसागरावर होत आहे. बंगालच्या उपसागरात आधीच एक कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यात आता आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा प्रभाव ओडिशा, आंध्रप्रदेशासोबतच विदर्भावर होणार असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात आधीच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक या पावसाने नाहीसे केले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली आणखी तीव्र झाल्यास विदर्भाला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर त्याचे परिणाम दिसून येत आहे. अप्रत्यक्षपणे हे चक्रीवादळ परिणाम करत असून त्यामुळे बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली आणखी तीव्र झाली, तर राज्यावर त्याचे परिणाम दिसून येतील. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मान्सून परतीच्या प्रवासात आहे. मात्र, या परतीच्या प्रवासातही मान्सूनने धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात त्याचे परिणाम दिसून येत आहेत. तर आता देखील ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. विदर्भावर त्याचा सर्वाधिक परिणाम होणार असून अमरावती, गडचिरोली, गोंदिया या विदर्भातील शहरांसह ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, पुणे (घाटमाथ्यावरील क्षेत्र), सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.