अमरावती येथील रामपुरी कॅम्प परिसरातील विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या १२ वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अखेर पोलिसांनी वसतिगृहाच्या गृहपालाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या विद्यार्थ्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

रवींद्र पांडुरंग तिखाडे (५०) रा. प्रियंका कॉलनी, अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या गृहपालाचे नाव आहे. आदर्श नितेश कोगे (१२, रा. जामलीवन, ता. चिखलदरा) या आदिवासी विद्यार्थ्याचा मृतदेह विद्याभारती विद्यालयाच्या वसतिगृहात गुरुवारी सकाळी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून, तो घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप वडील नितेश कोगे यांनी केला होता. आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला होता. प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला.

गृहपाल रवींद्र तिखाडे हा आदर्शला नेहमी मारहाण करीत होता. बुधवारी रात्री आदर्शने त्याच्या मोबाईलवरून व्हिडीओ कॉल केला आणि आपली काही विद्यार्थ्यांसोबत बाचाबाची झाली, आपली काहीही चूक नसताना गृहपालाने आपल्याला मारहाण केल्याचे त्याने सांगितले, असे नितेश कोगे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विद्याभारती शिक्षण संस्थेकडून स्थानिक रामपुरी कॅम्प भागात विद्याभारती माध्यमिक विद्यालय व त्याच आवारात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह चालवले जाते. आदर्श हा विद्याभारती माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. तो येथे विद्याभारती वसतिगृहात अन्य विद्यार्थ्यांसमवेत राहत होता.

आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गुरुवारी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला होता. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार आदर्शचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला आहे. याप्रकरणी गृहपाल रवींद्र तिखाडे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी सांगितले.