अकोला : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणापूर्वीच त्यावरून भरधाव वाहने पळवण्याचे प्रकार सुरूच आहेत. वाहनधारकांच्या बेपर्वाईमुळे मूक प्राण्यांचेदेखील बळी जात आहेत. वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच गायींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे काही टप्प्याचे काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप त्याचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. लोकार्पणाचा कार्यक्रम दोन वेळा स्थगित करून पुढे ढकलण्यात आला. निकृष्ट कामावरूनसुद्धा समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. विदर्भात समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा लागली आहे. समृद्धी महामार्ग तयार असलेल्या भागावरून वाहनधारकांकडून भरधाव वेगात चारचाकी वाहने चालवण्यात येतात. त्यामुळे अपघाताचे सत्र सुरू आहे. यात अनेकांचा मृत्यूदेखील झाला. या पार्श्वभूमीवर, अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये, असे स्पष्ट करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहतुकीवर निर्बंध घातले. तरीही अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक सुरूच आहे.

समृद्धी महामार्गावरील भरधाव वाहतूक आता मूक प्राण्यांच्या जीवावर उठली आहे. वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यात पेडगाव ते पांग्रीदरम्यान समृद्धी महामर्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच गायींचा मृत्यू झाला. या प्राण्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात महामार्गावर पडून होते. समृद्धी महामार्गाच्या पॅकेज २०१ मध्ये हा अपघात झाला. या पॅकेजमधील कामात अनेक त्रुटी असल्याचे समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्रामसंघर्ष संघटनेचे समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी सांगितले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे ते म्हणाले.