वर्धा : लोकशाही व्यवस्थेत समस्येवर लक्ष वेधण्यासाठी विविध मार्ग धरल्या जातात. मोर्चे, आंदोलन, उपोषण, निदर्शने व अन्य. मात्र सर्वात गंभीर ठरतो तो रेल रोकोचा ईशारा. आणि विरोधी पक्ष त्याचा वेळोवेळी उपयोग करीत आला आहे. पण सत्ता पक्षाच्याच आमदाराने रेल्वे वर ठाण मांडून बसण्याचा इशारा दिला तर ?
येथे तसेच झाले आणि रेल्वे प्रशासन हडबडले. देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने हे तसे सामंजस्य राखून काम करणारे म्हणून परिचित. पण सत्ता पक्षात असूनही तड लागत नाही म्हणून संताप व्यक्त करून चुकले. या मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहे. समस्या वाढतच आणि प्रशासन दखल घेत नाही म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पुलगाव शहरातील मंजूर रेल्वे पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. परिणामी वाहतूक कोंडी, अपघात, त्यातून होणारे वाद याने नागरिक त्रस्त आहे. म्हणून आमदार बकाने यांनी समस्यांचा पाढाच वाचला. या पुलाची नेमकी स्थिती त्यांनी जाणून घेतली. त्याचा तपशील रेल अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आला. ते पाहून नाराजी व्यक्त केली. जोवर अंडरपासचे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत बंद केलेले गेट पूर्ववत सूरू करावे व वाहतूक खोलंबा थांबवा, असे निर्देश त्यांनी दिले आहे. पावसाळ्यात कुरझडी व दहेगाव अंडर पासमध्ये पाणी साचते. ते वाहून जाण्यास मार्ग नसल्याने उपाय गरजेचे आहे. त्यासाठी नवी पंपिंग यंत्रणा बसविण्याची सूचना त्यांनी केली.
पुलगाव – आर्वी विस्तार प्रकल्प रखडलाच आहे. अनेक वर्षांपासून चालढकल सूरू आहे. त्यास उत्तर देतांना रेल अधिकारी रवींद्र सिंह व संजीव मूळे यांनी भू संपादन बाकी असल्याचे नमूद केले. त्यावर मी स्वतः आता रेल्वे मंडळाकडे याचा पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
पुलगाव शहरात विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण हे विविध कामांसाठी खेड्यातून येतात. म्हणून काही रेल्वे गाड्यांचे थांबे देण्याचे प्रस्ताव देण्याचे ठरले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुल मंजूर केला. मात्र काम मंद गतीचे. वर्धा – नांदेड रेल मार्गावर देवळी व भिडी ही स्थानके अपूर्ण सोयीने सूरू झाली. म्हणून पेयजल, टॉयलेट, तिकीट खिडकी व अन्य कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचना झाली.
रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रणव जोशी यांनीही काही प्रश्नांवर लक्ष वेधले. तसेच प्रशांत इंगोले व अँड. भार्गव व विविध वरिष्ठ अधिकारी विश्रामगृहावार संपन्न या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत प्रत्येक विभागास स्पष्ट सूचना देत पुढील महिन्यात बैठक घेऊन आढावू. सुधारणा दिसली नाही तर रेल रोको आंदोलन करणार, असा ईशारा रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांच्या समक्षच आमदार बकाने यांनी दिला.