नागपूर : त्रिभाषा सूत्र आणि मराठीवरून मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत सर्वत्र आंदोलने सुरू असताना पुन्हा एकदा मराठी भाषेवर वार करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. नुकतेच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही मुंबईतील एका कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ठाकरे बंधूनीही मराठी भाषेसाठी एकत्रित मेळावा घेतला होता. त्यानंतर अभ्यासक्रमातून मराठी साहित्य विषय हद्दपार केल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना नवीन शैक्षणिक धोरणाच्या आड काही विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांनी बी.ए. पदवी अभ्यासक्रमातून मराठी साहित्य विषय हद्दपार केला आहे. नवीन धोरणानुसार एकच भाषा विषय ठेवण्याची अनुमती असल्याने मराठी भाषा विषयातच साहित्यातील काही अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आल्याने साहित्य विषयाचाच अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मर्यादा येणार आहेत. यामुळे मराठी साहित्य शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा कार्यभारही कमी करण्यात आला आहे.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात बी. ए. पदवीच्या अभ्यासक्रमातून मराठी साहित्य विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०२४~२५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठात मराठी साहित्य या मुख्य विषयाला बंद करून मराठी भाषा हा एकच विषय नेमलेला आहे.

मराठी साहित्य विषयाचा कार्यभार शिल्लक न ठेवल्यामुळे रिक्त जागांवर तासिका प्राध्यापकांची नियुक्ती होऊ शकली नाही. तसेच मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही अडचण निर्माण झाली आहे. गडचिरोली हा गोंडवन प्रदेश असला तरी तो महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे.

महाराष्ट्राची भाषा मराठी व या भाषेतील वाङ्मयाचे अध्यापन हे मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जतन करणारा विषय आहे. अनेक साहित्यिक, समीक्षक, कलावंत, कवी, गीतकारांची जडणघडण मराठी साहित्याने केली आहे. असे असताना गोंडवाना विद्यापीठात मराठी साहित्य हद्दपार झाल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. तसेच या विषयाच्या कार्यभार कमी झाल्याने तासिका प्राध्यापकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

मराठी साहित्य विषयाचा कार्यभार शिल्लक न ठेवल्यामुळे रिक्त जागांवर तासिका प्राध्यापकांची नियुक्ती होऊ शकली नाही. गोंडवाना विद्यापीठात भविष्यात या सर्व नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. – डाॅ. प्रमोद लेंडे, अध्यक्ष, महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा अत्यंत गंभीर विषय असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोकळीक हवी. त्यांना हवे ते शिक्षण घेता यायला हवे. तसेच प्राध्यापकांचा कार्यभार कमी होत असेल तर हे अन्यायकारक आहे. त्यामुळे तात्काळ अधिष्ठात्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल. – डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ.