नागपूर/जालना : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालून निर्णय घेतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले, तर दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनाही चर्चेला येण्याचे आवाहन केले. त्यामुळे मराठा आरक्षणतिढय़ाच्या केंद्रस्थानी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. 

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवावा, मराठा आरक्षणाबाबत ते स्वत: लक्ष घालून योग्य निर्णय घेतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांकडे केले. फडणवीस म्हणाले, की जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांचे पथक त्यांच्याबरोबर आहे. जरांगे पाटील यांच्याबरोबर असणाऱ्यांनीही त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. तर दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आंतरवली सराटी येथे यावे, असे खुले आवाहन आंदोलनकर्ते मनोज जरांगे- पाटील यांनी रविवारी केले. दरम्यान, मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या जरांगे यांची प्रकृती पाचव्या दिवशी खालावली.

माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होऊ शकत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जरांगे यांना उद्देशून केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, ‘‘मला बोलता येते तोपर्यंत या, नंतर येऊन काही उपयोग होणार नाही. तुम्हाला कुणी अडवणार नाही.’’ दोन दिवसांत आरक्षण मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केल्याच्या संदर्भात जरांगे यांनी, ‘‘हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का सांगत नाहीत,’’ असा सवाल केला. 

हेही वाचा >>>उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगेंचे हात थरथरले; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांच्याबरोबरच्या…”

किमान पाणी तरी घ्या, असे आवाहन जरांगे यांना रविवारी दूरध्वनीवरून मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याचा उल्लेख करून जरांगे म्हणाले, ‘‘मी आतापर्यंत त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. परंतु मराठा समाजाच्या लेकराबाळांचा प्रश्न असल्याने आपण पाणी घेऊ शकत नाही. मराठा समाजाने खूप वेदना सहन केल्या आहेत हे ओळखून आता सरकारने त्यांना न्याय द्यावा. माझेही कुटुंब आहे. परंतु, आपण आता अगोदर समाजाचे आहोत. लढाईस जाताना क्षत्रियाने रडायचे नसते तर लढायचे असते. आरक्षण मिळाल्याशिवाय आपण आता मागे हटणार नाही. आता सरकारसमोर दोनच पर्याय आहेत. एक तर आरक्षण द्या किंवा मराठा समाजाच्या शांततेच्या आंदोलनाचा सामना करा.’’

दरम्यान, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली.

महिलांचेही उपोषण

जालना जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक गावांत साखळी उपोषण चालू आहे. जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे फलक लागले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिलाही जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात उतरल्या आहेत. भोकरदन येथे महिलांनी मोर्चाही काढला. परतूर तालुक्यातील मांडवा देवी परिसरातही महिलांनी उपोषण सुरू केले आहे. 

हेही वाचा >>>उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, आज दिल्ली दौरा का? कारण सांगत राहुल नार्वेकर म्हणाले…

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे स्वत: योग्य निर्णय घेतील. जरांगे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा. जरांगे यांच्या तब्येतीची काळजी त्यांच्या सहकाऱ्यांनीही घेतली पाहिजे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला बोलता येतेय तोपर्यंत चर्चेस या, नंतर काही उपयोग नाही. दोन दिवसांत आरक्षण मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्री व्यक्त करतात पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते का सांगत नाहीत?- मनोज  जरांगे-पाटील, मराठा आंदोलनकर्ते