बुलढाणा : सर्वोच्च न्यायालयाच्या संकल्पनेनुसार न्यायालयांचे कामकाज आता ‘पेपरलेस’ पद्धतीने होणार आहे. यासाठी जिल्हा न्यायालयात ई-फायलिंग यंत्रणा कार्यान्वित झाली असून पुढील महिन्यात १२ तालुका न्यायालयात ही प्रणाली कार्यन्वित होणार आहे.
उच्च न्यायालय व महाराष्ट्र-गोवा वकील संघाच्या पुढाकाराने ही प्रणाली कार्यन्वित करण्यात येत आहे. पहिल्या टप्पात प्रमुख जिल्हा न्यायालयात ई-फायलिंग व फॅसिलिटी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे आता दाखल होणारी नवीन प्रकरणे( खटले) ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येत आहे. यासाठी सुविधा केंद्रात २ संगणक, २ स्कॅनर प्रिंटर, वेब कॅमेरा, माईक ही उपकरणे बसविण्यात आली आहे. केंद्रात वकिलांच्या मदतीसाठी २ परिचालक नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा समन्वयक म्हणून ऍड सौरभ ढगे तर तांत्रिक प्रमुख म्हणून प्रदीप शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता एका क्लिकवर… जाणून घ्या ‘आरोग्य अधार’ ॲपबद्दल…
अशी आहे कार्यपद्धती
जिल्हा न्यायालयात वकिलांना या सुविधा केंद्रातून प्रकरणाची सर्व कागदपत्रे स्कॅन करावी लागणार आहे. तसेच न्यायाधीशासमक्ष ( प्रकरण सत्य व अचूक असल्यासंदर्भातील) लेखी प्रतिज्ञापत्र ‘वेब कॅमेरा व माईक’ च्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहे. त्यांनी इ फायलिंग द्वारे दाखल केलेल्या प्रकरणाची पडताळणी अधीक्षक वा उप अधीक्षक करतील. त्यानंतर हे प्रकरण संबधित न्यायाधीशांसमक्ष जाईल. संगणकावर ते प्रकरण आल्यावर ते त्या-त्या दिवसाच्या सुनावणीचा क्रम ठरवतील. त्यानुसार प्रकरणांची सुनावणी होईल. यामुळे न्यायालयाचे कामकाजात आणखी पारदर्शकता येणार असून वेळेचा अपव्यय व अनावश्यक गर्दी टाळणे शक्य होणार आहे. तालुका न्यायालयात ही यंत्रणा करण्यासाठी २० सप्टेंबर २०२३ ची मुदत देण्यात आल्याचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड विजय हिंमतराव सावळे यांनी स्पष्ट केले.