नागपूर : महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे विधानसभा निवडणुकीत दिसले, पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते दिसेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले.

शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीला जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे दिसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले ‘दोन्ही भाऊ वाढदिवसाला भेटले याचा आनंदच आहे. पण, त्याचे राजकारण होऊ नये, महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे विधानसभा निवडणुकीत दिसले.

आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही दिसेल. मात्र, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे, हे सांगता येणार नाही तसेच त्यांच्या मनात जे आहे तेच महाराष्ट्राच्या मनात आहे असे म्हणणेही योग्य नाही.’

पुण्यातील रेव्ह पार्टीसंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, प्राथमिक माहितीत पोलिसांनी रेव्ह पार्टीवर कारवाई केली आहे. माहिती घेतल्यानतंरच यावर अधिक बोलता येईल. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांच्या जावयाने ही पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्र्यांनी संवाद ठेवावा

मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांशी संवाद ठेवावा, सामंजस्य दाखवावे, काही अडचणी असेल तर मला सांगाव्या, पण पत्र लिहून नाराजी व्यक्त करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजप मधील मंत्र्यांमधील वादावर व्यक्त केली. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात खात्याच्या बैठकांवरुन जुंपली आहे. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, दोघेही शासनाचेच घटक आहे. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचे अधिकार आहेत. पण धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घ्यावे.