नागपूर : सक्करदरा तलावाच्या बाजूच्या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्याने परिसरातील वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तलावातून काढलेला गाळ बाजूला टाकला असून त्याचे ढिगारे तयार झाले आहे. त्यावर बसून अनेक युवक दारू, गांजा व अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळतात. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सक्करदरा तलावातून काढलेल्या गाळाचे ढिगारे तयार झाले आहेत. त्याच्या आडोशाला गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण बसतात. ढिगाऱ्यामुळे तेथील सुस्थितीतील रस्तासुद्धा नाहीसा झाला आहे. त्यामुळे सक्करदरा तलावावर फिरायला येणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. दुपारी या ढिगाऱ्यावर काही युवक सर्रासपणे मद्यप्राशन करीत असतात. मद्याच्या बाटल्या किंवा उरलेले खाद्य सक्करदरा तलावात टाकण्यात येते. परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. गेल्या काही दिवसांपासून येथे अंमली पदार्थांचे सेवन करणारे, गांजा पिणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. काही गुन्हेगारी युवकांच्या टोळ्या येथे अवैध व्यवसाय करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – नागपुरात राजकीय नेत्याच्या कारचे ‘हिट अ‍ॅण्ड रन’, पाच वाहनांना धडक

पोलिसांनी गस्त वाढवावी

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सक्करदरा तलावाच्या बाजूला पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांच्या टोळ्यांमुळे सक्करदरा तलावावर फिरायला येणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. तरुणी व महिला वर्गांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – MPSC Update: ‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षेच्या तारखेसंदर्भात मोठी अपडेट, बैठकीमध्ये निर्णय होताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेचेही दुर्लक्ष

सक्करदरा तलावाच्या परिसरात सकाळी जवळपास पन्नासपेक्षा जास्त भटके कुत्रे गोळा होतात. अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेनेसुद्धा याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. तसेच तलावावर निर्माल्य ठेवण्यासाठी व्यवस्था अपुरी असल्यामुळे अनेक जण तलावात निर्माल्य फेकतात. त्यामुळे जल प्रदूषणही होत आहे.