नागपूर : राज्य सरकारने आता करोनाचे बहुतांश निर्बंध शिथिल केले असून नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे सुरू होत आहेत. २२ ऑक्टोबरला उपराजधानीत चित्रपट व नाटय़गृहाचा पडदा उघडत असून शहरातील कवी सुरेश भट सभागृहात ‘काही क्षण आयुष्याचे’ या नाटकाचा प्रयोग होत आहे.

चित्रपटगृहे आणि नाटय़गृहांना एकूण आसनसंख्येच्या ५० टक्के प्रेक्षकांची अट घालण्यात आली आहे. तसेच करोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. सरकारच्या निर्णयानंतर शहरातील एकल आणि बहुपडदा सिनेमागृहांनी तयारी केली आहे. सिनेमागृह निर्जंतुकीकरण करण्यात आले. एका आसनानंतर दुसरे आसन प्रेक्षकासाठी बंद करण्यात आले आहे. जसवंत तुली आयनॉक्समध्ये ‘वेनम’ या हॉलीवूडपटाचे खेळ दाखवण्यात येणार असून त्याकरिता ऑनलाईन बुकिंग उपलब्ध करून देण्यात आली. तर पीव्हीआर एम्प्रेस या बहुपडदा सिनेमागृहात बॉण्डपट ‘नो टाईम टू डाय’ आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘बेलबॉटम’ हा सिनेमाचे खेळ सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील अनेक एकपडदा व दोन पडदा सिनेमागृहही सुरू होणार आहेत.

नाटकाच्या प्रयोगासाठी शहरात कवी सुरेश भट सभागृह, डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह आहेत. त्यापैकी उद्या शुक्रवारी पडदा उघडताच कवी सुरेश भट सभागृहात ‘निर्मोही’ संस्थेतर्फे सायंकाळी ६ वाजता ‘काही क्षण आयुष्याचे’ या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला आहे. सभागृह निर्जंतुकीकरण करण्यात आले आणि एका आसनानंतर दुसरे आसन प्रेक्षकाकरिता बंद करण्यात आले आहे. ५० टक्के क्षमतेने सभागृह सुरू करण्याचे शासनाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करण्यात येत असल्याची माहिती सभागृहाचे व्यवस्थापक राहुल गायकी यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.