महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित यांची माहिती

नागपूर : शहराच्या चारही दिशांना जोडणारा मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर या सेवेचा सर्व नागपूरकर लाभ घेऊ शकतील, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त के ला.

नागपूर मेट्रो रेल्वेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाणारा १.६ किलोमीटर अंतराचा बर्डी ते कस्तुरचंद पार्क मेट्रो मार्ग शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या मार्गावरील झिरोमाईल व कस्तुरचंद पार्क  या दोन स्थानकांचे उद्घाटन २० ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. दीक्षित यांच्याशी बातचीत के ली असता त्यांनी मेट्रोच्या आतापर्यंतच्या कामाचा लेखाजोखा मांडला. मेट्रोचा पहिला टप्पा के व्हा पूर्ण होईल, असे दीक्षित यांना विचारले  असता ते म्हणाले,  सीताबर्डी ते खापरी आणि सीताबर्डी ते लोकमान्यनगर या दोन  मार्गिका सुरू झाल्या आहेत.

कामठी मार्गावर ऑटोमोटिव्ह चौक आणि सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील  प्रजापतीनगर या दोन मार्गिका डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने मेट्रोच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर नागपूरकरांना मेट्रोद्वारे शहराच्या चारही भागात जाता येईल. त्यांच्या सोयीसाठी आम्ही स्थानकावर फीडर सेवा व वाहनतळाची व्यवस्था केली आहे.

कस्तुरचंद पार्क  व झिरोमाईल स्थानके  खुली झाल्यावर प्रथमच मेट्रो बर्डीच्या पुढे धावणार आहे. कस्तुरचंद पार्क स्थानकावरून खापरीसाठी मेट्रो सुटेल. त्यामुळे थेट खापरीतील लोकांना कस्तुरचंद पार्कपर्यंत येता येईल व तेथून त्यांना जिल्हाधिकारी, तहसील, विभागीय आयुक्त कार्यालयात जाता येईल. शिवाय  शहरातील प्रमुख बाजारपेठ सदर बाजारही तेथून जवळ पडेल. झिरो माईल स्मारक, फ्रिडम पार्क, विधानभवन, भारतीय र्झिव्ह बँकेसाठी (आरबीआय) संपर्काचे नवे साधन प्राप्त होईल, असे दीक्षित म्हणाले. नागपूर मेट्रोबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नॉन-फेअर बॉक्स महसूल. हा एकूण महसुलाच्या ५० टक्के असेल. मेट्रोच्या खुल्या जागांचा वाहनतळ व व्यावसायिक कामांसाठी वापर करून तो प्राप्त केला  जाणार आहे. विविध स्थानकांवर स्थानिक व्यावसायिकांसाठी भाडेतत्त्वावर जागा दिली जाणार आहे तसेच स्थानकांवर जाहिरातींच्या हक्कांचा लिलावही केला जाणार आहे, असेही दीक्षित म्हणाले.

दुसऱ्या टप्प्याचा दहा लाख लोकांना फायदा

मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. हा ४३.८ किमीचा टप्पा आहे. यामुळे शहरालगतच्या वस्त्यांना मेट्रोद्वारे जोडले जाणार आहे. पूर्वेकडे ट्रान्सपोर्ट नगर (कापसी) आणि पश्चिमेकडे हिंगणा, उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेकडे बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत मेट्रोचा विस्तार होईल. हा टप्पा पूर्ण झाल्यावर त्याचा शहरातील दहा लाख लोकांना दळणवळणाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. कन्हान मार्ग कामठीमधून जातो तसेच कन्हानमध्ये वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) च्या कोळसा खाणी आहेत. बुटीबोरी एमआयडीसी ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे या सर्व ठिकाणी काम करणाऱ्यांना मेट्रोचा निश्चित फायदा होईल, असा असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.

आगळावेगळा ‘फ्रिडम पार्क’ 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  झिरोमाईल स्थानक परिसरातील ४० हजार चौरस फूट क्षेत्रफळात ‘फ्रिडम पार्क’ तयार करण्यात येणार आहे. हे एक सार्वजनिक उद्यान असून उत्कृष्ट उद्यानापैकी एक असेल. यात  ऐतिहासिक व पुरातन स्मृतींना उजाळा दिला जाईल. हिस्ट्री वॉल, वॉर ट्रॉफी आदींचा समावेश असेल. शिवाय बॅटल टँक, अ‍ॅम्फिथिएटर, आर्चेस ऑफ ग्लोरी आणि इन्फॉर्मेशन सेंटर तेथे राहील, असे दीक्षित म्हणाले.

महामेट्रोचे इतर प्रकल्प

महामेट्रो नागपूरच्या प्रकल्पासह  पुणे मेट्रोचे दोन कॉरिडॉरदेखील कार्यान्वित करीत आहे. या वर्षांच्या अखेरीस तेथे गाडय़ा धावू लागतील. नाशिकमध्ये  मेट्रो निओ प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. ते मंजूर होताच महामेट्रो काम सुरू करेल. नवी मुंबई मेट्रोच्या लाईन १ चे उर्वरित कामदेखील पूर्ण करीत आहे आणि १० वर्षे त्याचे संचालन आणि देखभाल दुरुस्तीचे कामही महामेट्रो करणार आहे. याशिवाय  ठाणे आणि वारंगल मेट्रोचे सविस्तर अहवाल आम्ही तयार केला आहे, असे दीक्षित यांनी सांगितले.

६५ टक्के ऊर्जेची पूर्तता सौरऊर्जेपासून

आम्ही आमच्या सर्व स्थानकांच्यावर पीव्ही सौर पॅनेल स्थापित केले आहेत आणि इतर सर्व इमारती व कार्यालयांना कव्हर करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. कचरा, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आमच्या सर्व स्थानकांवर बायो-डायजेस्टर स्थापित करण्यात आले आहेत, असे दीक्षित यांनी सांगितले.