चंद्रपूर : मागील वर्षीच्या महापुरात व अतिवृष्टीत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये याप्रमाणे तीन हेक्टरपर्यंत म्हणजे ४० हजार ८०० रुपयांची मदत करण्यात आली होती. मात्र, सरकारने यावर्षी घुमजाव करीत आपलाच निर्णय बदलत हेक्टरी ८५०० रुपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच मदत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कितीही झाले तरी त्यांना केवळ १७ हजार रुपये मिळणार आहे.
यावर्षी वेगवेगळ्या भागांत नद्यांना तीन ते सहा वेळेला आलेले महापूर व काही धरणांतील पाण्याचा उत्सर्ग केल्याने महापूर आल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी झाली. पुरामुळे जमीन खरडून गेल्यामुळे जमिनीचा पोतही खालावला असून सुपीकतेवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपाचे पीक बुडाल्यामुळे गतवर्षी प्रमाणेच मदत देण्याऐवजी व अशा बिकट प्रसंगी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी महागाई कमी झाली की काय, असा साक्षात्कार झाल्यासारखे समजून या तिघाडीच्या सरकारने अतिवृष्टी, महापूर यांच्यासाठी गतवर्षी प्रमाणेच मदत न देता ती कमी करून ८५०० रुपये प्रति हेक्टर व दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच केली आहे. अर्थात शेतकऱ्यांना केवळ १७ हजार रुपये मिळतील. ही बाब शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्यायकारक असून ‘सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार यही समस्या है’ हे सरकारने कृतीने सिद्ध केले आहे. या निर्णयाचा शेतकरी संघटना संघटनेने निषेध केला आहे.




हेही वाचा – विदर्भातील एकमेव लाकडी गणपती ज्याचे विसर्जन होत नाही…
हेही वाचा – गोंदिया : ईटियाडोह धरण ओव्हरफ्लो; सतर्कतेचा ईशारा
गतवर्षी प्रमाणे खास बाब म्हणून वाढत्या महागाईचा विचार करता २५ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टर करिता ७५ हजार रुपये एवढी मदत करावी, अशी मागणी इ-मेल द्वारे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, ललित बहाळे, प्रज्ञा बापट, अनिल घनवट, शैला देशपांडे, जयश्री पाटील, अंजली पातुरकर, मदन कांबळे यांनी केली आहे.