यवतमाळ – जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य तेथील वाघांमुळे आता देशभरातील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण झाले आहे. टिपेश्वरमध्ये हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने येथे पर्यटकांची सतत गर्दी असते. येथील वाघही पर्यटकांना नाराज करत नाही. ते विविध व्याघ्रलिला पर्यटकांना हमखास दाखवतात. शनिवारी सायंकाळी अभयारण्यातील तलावात ‘फोर मार्क’ वाघिणीने आपाल्या बछड्यांसह भरवलेली ‘मस्ती की पाठशाला’ पर्यटकांना न भूतो न भविष्यती आनंद देणारी ठरली.
शनिवारी काही पर्यटक दुपारची सफारी करत असताना, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अभयारण्यातील जलाशयात फोर मार्क वाघिण तिच्या तीन बछड्यांसह पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेत होती. हे बछडे आपल्या आईच्या अंगावर मनमुराद खेळत होते. एकमेकांच्या अंगावर पाणी उडविणे, उड्या मारणे अशा खेळात ते दंग झाले होते. मध्येच एका बछड्याने आपल्या आईचा चेहरा दोन्ही पंजांनी धरूण तिचा मुका घेतला. नंतर दुसऱ्या बछड्यानेही त्याचे अनुकरण केले. एक बछडा किनाऱ्यावर जावून पाण्यातील आपल्या भावंडांना वाकुल्या दाखवत होता. त्यानंतर वाघिणीसह सर्व बछडे पाण्याबाहेर आले. वाघिण जमिनीवर पहुडल्यानंतर हे बछडे दूध पिताना दिसतात. फोर मार्क वाघिणीच्या कुटुंबाची ही सर्व मस्ती पुणे येथील पर्यटक ओमकार कुळकर्णी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
टिपेश्वर अभयारण्यात सध्या २० ते २२ वाघ असल्याचे सांगण्यात येते. ‘छावा’, ‘आर्ची’, ‘वीर’, ‘सितारा’, ‘तालाबवाली’, ‘जंजिर’, ‘फोर मार्क’ हे सर्व वाघ टिपेश्वरच्या जंगलात साम्राज्य करत आहेत. त्यांची एक छलक पाहण्यासाठी पर्यटक उतावीळ असतात. टिपेश्वरमधील ‘वीर’ हा वाघ सध्या जखमी असल्याचे सांगण्यात येते. तो दृष्टीस पडत नसल्याने त्याची शिकार तर झाली नाही ना, अशी शंका पर्यटकांमध्ये उपस्थित होत आहे. वाघांशिवाय इतरही समृद्ध वन्यजीव या जंगलात आहेत. हे अभयारण्य आकाराने लहान असले तरी येथे वन्यप्राण्यांना सुरक्षित अधिवास मिळत असल्याने येथील वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे. सोबतच विविध प्रजातीच्या पक्षांनीही अभयारण्याच्या वैभवात भर घातली आहे. पावसाळ्यात अभयारण्यातील सफारी बंद होत असल्याने अखेरचे दोन आठवडे पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची संधी आहे. त्यानंतर सप्टेंबरनंतरच सफारी सुरू होईल.
टिपेश्वरमध्ये कसे पोहोचाल?
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील पांढरकवडा येथून २० कि. मी. अंतरावर, यवतमाळहून घाटंजीमार्गे ६० किमी तर तेलंगणातील अदिलाबादपासून ४२ कि. मी. अंतरावर हे अभयारण्य आहे. पांढरकवडा येथून पर्यटकांना सुन्ना गेटमधून तर घाटंजी मार्गे गेल्यास माथनी प्रवेशदारातून टिपेश्वरमध्ये सफारीसाठी जाता येते. परिसरात अलिकडे विविध रिसॉर्ट आणि होम स्टेची सुविधा झाल्याने महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात या राज्यातील पर्यटकांचा ओढा येथे वाढला आहे.