लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: गृहमंत्र्यांच्या शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून गेल्या चोवीस तासांत चार हत्याकांडाच्या घटना समोर आल्या आहेत. जरीपटका, सोनेगाव, सीताबर्डी आणि नंदनवन या परिसरात या घटना घडल्या.

पहिल्या घटनेत, नागपुरातील दोन नामांकित व्यापाऱ्यांचे अपहरण करून गोळ्या घालून खून करण्यात आला. दोघांचेही मृतदेह नदीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निरालाकुमार सिंह (४३, एचबी टाऊन) आणि अंबरीश देवदत्त गोळे (४०) असे खून झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. दोन्ही व्यापारी एकमेकांचे मित्र होते. दोघांचेही हिस्लॉप महाविद्यालयाजवळील चिटणवीस सेंटरजवळून अज्ञात आरोपींनी अपहरण केले. दोघांनाही गोळ्या घालून ठार मारल्यानंतर कोंढाळी परिसरात दोघांनाही जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दोघांचेही अर्धवट जळालेले मृतदेह कारमध्ये भरून वर्धा नदीत फेकून देण्यात आले. एका व्यापाऱ्याचा मृतदेह तिवसाजवळील एका गावात तर दुसऱ्याचा खडगा गावाजवळ सापडला.

आणखी वाचा-खासगी विमानाचे मालक आणि बरेच काही… कोळसा खाण वाटप प्रकरणात शिक्षा झालेले मनोज जयस्वाल आहेत तरी कोण?

दुसऱ्या घटनेत, आरोपी सूरज माणिकराव रक्षक (४५, रा.पडोळेनगर) या कुख्यात गुंडाने बहिणीची हत्या केली. त्याची बहीण खुशी किरण चौधरी (३८) ही आजारी असल्यामुळे माहेरी राहते. आजारपणामुळे ती नेहमी खाटेवर पडून असते. तिची सेवा करावी लागत असल्यामुळे सूरज कंटाळला होता. बुधवारी रात्री सूरजचा बहिणीशी वाद झाला. त्याने बहिणीच्या तोंडावर, नाकावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या बहिणीचा काही तासांतच मृत्यू झाला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरजला अटक केली.

तिसऱ्या घटनेत, जरीपटक्यातील शेखर (४०) या कचरा वेचणाऱ्या व्यक्तीने एका १६ वर्षीय मुलाला बुधवारी शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या पायावर बर्फ फोडण्याच्या शस्त्राने वार केला. त्यामुळे मुलाचा राग अनावर झाला. त्याने घरातून तलवार काढली आणि शेखरवर १५ वार केले. शेखरचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा-नागपूर: रेल्वे पुलावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या हलगर्जीपणाचे बळी

दोन्ही व्यापारी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी सीताबर्डी आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल होत्या. दोघांच्याही जीवाला धोका असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती. मात्र, व्यापाऱ्यांच्या बेपत्ता होण्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे केवळ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप आता होत आहे.