नागपूर : मार्च महिन्यात नागपूमध्ये धार्मिक भावना भडकवल्यामुळे मोठी धार्मिक दंगल उसळली होती. विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.
औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली. यावरून धार्मिक भावना दुखावल्याने दंगल उसळली होती. यानंतर या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आठ कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली होती. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र- गोवा राज्याचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांची भूमिका फार महत्त्वाची होती. त्यांना आता विहिंपने मोठी जबाबदारी दिली आहे.
विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय व्यवस्थापन समितीची बैठक नुकतीच जळगाव येथे संपन्न झाली. या बैठकीत विहिंपच्या कार्यविस्तारासाठी अनेकांच्या जबाबाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र- गोवा राज्याचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांची केंद्रीय सहमंत्री तसेच नैतिक मूल्य शिक्षा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे आंतराष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आलोक कुमार, महामंत्री बजरंगलाल बागडा, संघटन महामंत्री मिलिंद परांडे, सह संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव व विहिंपचे उपाध्यक्ष चंपतराय यांच्याहस देशभरातील २६५ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
अनेकांची जामीनावर सुटका
नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची तब्बल ४ महिन्यानंतर जामीनावर सुटका करण्यात आली आहे. १७ मार्च २०२५ रोजी नागपूरच्या महाल भागात दंगल उसळलेली होती. त्यावेळी मोठ्या संख्येत एकत्रित आलेल्या जमावने पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. या संपूर्ण घटनेमागे मास्टरमाइंड फहीम खानच असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी फहीम खानला अटक केली होती.
१७ मार्च रोजी नागपूर शहरच्या महाल, हंसापुरी भालदारपुरा यासह अनेक भागात उसळलेल्या दंगलीत सहभागी असलेल्या दीडशे पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल करण्यत आले होते. त्यात अनेक अल्पवयीन मुलांचासुद्धा समावेश होता. पोलिसांनी दंगलीच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तापसल्यानंतर अनेकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मध्यंतरी या प्रकरणातील अनेक आरोपींना न्यायालयाने जमीन मंजूर केला होता.