चंद्रपूर : एप्रिलच्या मध्यात या जिल्ह्यात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. सलग सातव्या दिवशी चंद्रपूरने तापमानाचा उच्चांक गाठला असून मंगळवारी ४३.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. विदर्भ तथा राज्यात हे सर्वाधिक तापमान आहे.
एप्रिल महिना सुरू होत नाही तोच चंद्रपूर शहराने तापमानाचे विक्रम नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तीन ते चार दिवस सलग ४३.२ अंश डिग्री तापमानाची नोंद घेतल्यानंतर आता तापमानाचा आकडा त्याही पुढे गेला आहे. मंगळवारी विक्रमी ४३.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेतल्या गेली आहे. कडक उन्हामुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केल्याने दुपारी बारा वाजतापासून रस्त्यांवर संचारबंदी लागल्यागत स्थिती येथे बघायला मिळते. शहरातील मुख्य बाजारासह सर्वत्र शुकशुकाट असतो.
हेही वाचा >>> अजितदादांच्या मनात ‘तसे’ काही असणे अशक्य, माजी मंत्री राजेंद्र शिंगणेचा दावा
दरम्यान, आज तापमानाने उच्चांक गाठला असला तरी आकाशात काळे ढग एकत्र आले आहेत. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यताही वर्तवली जात आहे. चंद्रपूर पाठोपाठ ब्रम्हपुरी व गोंदिया शहरात ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेतली गेली आहे. त्यापाठोपाठ वर्धा व यवतमाळ या दोन शहरात ४३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. अकोला व अमरावती ४२.८, वाशीम ४२, नागपूर ४१.२, गडचिरोली ४०.६ तर बुलढाणा ३९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.