नागपूर : राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यामध्ये धान, संत्रा व मोसंबीच्या फळगळीचे, तसेच सोयाबीनवरील ‘येलो मोझॅक’मुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. वरील पिकांच्या नुकसानीचाही पंचनाम्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात भाताचे पीक अनेक दिवसांपासून पाण्याखाली आहे. सततच्या पावसामुळे शेतातून पाणी निघत नाही. पाणी साचून राहिल्याने धानाचे पीक काही ठिकाणी सडले आहे. तसचे अजूनही सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाताच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भाताचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. स तसेच नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर गेलो असताना, मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीच्या झाडांवर बुरशीचा रोग आला आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन नुकसान झाले आहे. तसेच, सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक’चा प्रभाव असल्याने ते पीकही नष्ट झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असूनही, कोणतीही सरकारी यंत्रणा अद्याप पंचनामे करण्यासाठी आलेली नाही. त्यामुळे, नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून संत्रा, मोसंबी, तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली असल्याचा उल्लेखही अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात केला आहे.
२३ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. यात विदर्भातील ६,७५,८२०.०६ हेक्टरमध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांकरिता ५८९.४५ कोटी मंजूर करण्यात आले. मात्र, यात नागपूर जिल्ह्याचे केवळ १,०८३.९९ हेक्टरमध्ये नुकसान दाखवले असून, त्यासाठी फक्त ९५.९७ लाख (जवळपास ९६ लाख रुपये) मंजूर केले आहेत. ऑगस्ट २०२५ नंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, पण अतिवृष्टीमुळे बुरशी रोग येऊन झालेल्या संत्रा व मोसंबीचे, तसेच ‘येलो मोझॅक’ मुळे होणाऱ्या सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप देण्यात आले नाहीत, असेही अनिल देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.