नागपूर : फेसबुक मित्रासोबत बायको पळून गेल्याने तिला परत आणण्यासाठी नवऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली.

याचिकाकर्ता नवऱ्याला ८ फेब्रुवारी रोजी त्याची बायको बेपत्ता असल्याचे लक्षात आले. संपूर्ण दिवसभर सगळीकडे शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी, ९ फेब्रुवारी रोजी त्याने बायको बेपत्ता असल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलिसांत दिली.

हेही वाचा…अकोला : प्रचारात भेटीगाठी, जेवणावळीची धूम, उमेदवारांकडून…

बायको तिच्या फेसबुक मित्रासोबत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे पळून गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. बायको दोन महिन्यांपासून घरी परतली नसल्याने नवऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. दोन मुलांना मागे ठेवत तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ती फेसबुक मित्राच्या दबावात असल्याचा संशय नवऱ्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे आपणास बायकोचा ताबा मिळावा (हेबियस कॉर्पस), अशी विनंती उच्च न्यायालयाला केली. न्यायालयाने बायकोला न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश मागील सुनावणीदरम्यान बडनेरा पोलिसांना दिले होते.

हेही वाचा…वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा

तिची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली. मी माझ्या मर्जीने बडनेरा येथे आले असल्याचे बायकोने न्यायालयाला सांगितले. नवऱ्याला घटस्फोट देणार असल्याचेही तिने नमूद केले. बायको सज्ञान असल्याने तिला तिचा निर्णय घेण्याची मुभा असल्याचे मत व्यक्त करीत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्या पतीतर्फे अॅड. रजनीश व्यास आणि अॅड. कीर्ती देशपांडे यांनी बाजू मांडली. राज्य शासनातर्फे अ‍ॅड. तृप्ती उदेशी यांनी युक्तिवाद केला.