नागपूर : मोसमी पावसाने राज्यातून गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. भारतीय हवामान खात्याने सुद्धा ऑगस्टचे दोन आठवडे राज्यातील बहुतांश भागात पाऊस नाहीच्या बरोबर राहील असे सांगितले आहे. मात्र, अशातच आता पावसाचा आणखी एक नवा अंदाज समोर आला आहे. या अंदाजानुसार पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे. आज, सोमवारी राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.
पूर्व विदर्भात पाऊस कुठे
पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे पाच जिल्हे आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यात पाऊस कुठे
मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दीला आहे. धाराशिव, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कसा
पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये श्रावण सरींनी हजेरी दिसून येत आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागावर देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असून सोलापूरमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात पावसाची स्थिती
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई, कोकणात पावसाची स्थिती
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. त्याचबरोबर कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.