गडचिरोली : युद्ध क्षेत्राचा भास व्हावा अशी स्थिती सद्या गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात दिसून येत आहे. नक्षल्यांच्या सावटाखाली पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने विशेष तयारी केली असून अतिसंवेदनशील भागात मतदान यंत्र आणि कर्मचारी नेण्यासाठी वायुसेनेच्या ७ हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. नक्षल कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी विविध दलातील तब्बल १५ हजारांहून अधिक पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत.

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने राज्यात सर्वाधिक धोकादायक जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान प्रशासनाला इतर जिल्ह्याच्या तुलनेत विशेष तयारी करावी लागते. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात लोकसभेकरिता मतदान होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने सहा महिन्यांपासून तयारी चालवली होती. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी, गर्देवाडा, पिपली बुर्गी, मन्नेराजाराम येथे वर्षभरात ४ नवे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. एकेकाळी ही गावे नक्षल्यांचे नंदनवन समजली जायची. आता नक्षल्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. सोबतच दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते बांधकाम, यामुळेदेखील नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आले आहे.

हेही वाचा : सत्तेचा गैरवापर! लालपरीवर महायुतीच्या जाहिराती, प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला…

निवडणुकांचा पूर्वानुभव लक्षात घेता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागात हेलिकॉप्टरच्या साहाय्याने १६ एप्रिलपासूनच मतदान यंत्र आणि कर्मचारी पोहचवण्यात येत आहेत. त्यासाठी स्थानिक सी ६० जवानांच्या दिमतीला विविध दलातील १५ हजारहून अधिक पोलीस वायुसेनेचे ७ हेलिकॉप्टर देण्यात आले आहेत. आज, मंगळवारी अतिसंवेदनशील ६८ मतदान केंद्रांवरील ७२ पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. पुढचे दोन आणि निवडणुकीनंतर दोन दिवस सुरक्षितपणे मतदान पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झाली असून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

हेही वाचा : कोकणातील उदय सामंत म्हणतात, “शिंदे गट विदर्भातील सर्व जागा जिंकणार”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नक्षल्यांच्या हालचालींवर नजर

मागील वेळेस लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी २२ हिसंक कारवाया केल्या. यात सात लहान-मोठे बॉम्बस्फोट केले होते. काही ठिकाणी चकमकी उडाल्या होत्या. १ मे रोजी नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान शहीद झाले होते. त्यांनतर नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे ही चळवळ खिळखिळी झाली. पण, काही भागात धोका कायम असल्याने पोलीस यंत्रणा नक्षल्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन आहे.