नागपूर : लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार या बाबत अंदाज बांधले जात आहे. याबाबत रोज नवनवे सर्वेक्षण आपला अंदाज वर्तवत आहे. सर्वांचे लक्ष ४ जूनच्या मतमोजणीकडे लागले आहे. निकाल काय लागेल हेच स्पष्ट झाले नसताना आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. अनेक कंपन्या, खासगी संस्था या कामासाठी नागपुरात सक्रिय झाल्या आहेत.

नागपूरसह विदर्भात लोकसभेच्या दहा जागा असून त्यासाठी पहिल्या दोन टप्प्यात मतदान झाले. चार जूनला मतमोजणी आहे. मतदान झाल्यानंतर एक महिन्याहून अधिक काळापासून कोण जिंकणार याबाबत अंदाज बांधले जात आहे. सुरूवातीच्या काळात वर्तवण्यात आलेले अंदाज निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी बदलताच कलही बदलू लागले आहेत. कोण जिंकणार, कोणी कुठे आघाडी घेणार, कोणता मुद्दा कुठे प्रभावी झाला याच्या चर्चा महिन्याभरापासून सुरू आहेत. विविध वाहिन्या व न्यूज पोर्टल त्यांचे अंदाज जाहीर करू लागले आहे.

हेही वाचा…‘विको’चे अध्यक्ष यशवंत पेंढरकर यांचे निधन

मतमोजणीला दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने उत्सूकता आणखी वाढू लागली आहे. निकाल काय लागतो यावर पुढच्या राजकारणाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल महत्वपूर्ण आहे. या निवडणुका झाल्यानंतर सहा महिन्याने राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. मात्र लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. यासाठी काही खासगी संस्था, कंपन्यांना काम देण्यात आले असून त्यांचे प्रतिनिधी या भागातील जनमताचा कौल घेऊ लागले आहे. स्थानिक पत्रकारांकडून माहिती घेणे, त्यांच्याकडूनच राजकीय समीकरणे समजून घेणे, सामाजिक समीकरणांची माहिती घेणे सुरू झाले आहे.

वकिल, डॉक्टर्स, सामाजिक क्षेत्रातील प्रभावी नेत्यांची माहिती घेणे सुरू झाले आहे. कधी दूरध्वनीवर तर कधी प्रत्यक्ष भेटून माहिती संकलित केली जात आहे. ती करताना विधानसभेसाठी ही माहिती असल्याचेही प्रतिनिधींकडून सांगितले जात आहे.लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अनेकांना उमेदवारी नाकारताना सर्वेक्षणाचा आधार घेतला होता. त्यामुळे सर्वेक्षणाला महत्व आहे. लोकसभा निकालापूर्वीचे सर्वेक्षण निकालानंतर कितपत वास्तविक ठरणार हा प्रश्न आहे.

हेही वाचा…बुलढाणा : दोन वाघांसह अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन! अंबाबरवा’मधील समृद्ध वन्यजीव वैभव

राजकीय पक्ष लाखो रुपये या सर्वेक्षणावर खर्च करतात.मात्र त्याच्या खरेपणाबद्दल शंका यावी, असे चित्र सध्या नागपुरात दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत, त्यात रामटेक व नागपूर या मतदारसंघाचा समावेश होतो. नागपूरमधून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. तर रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्याम बर्वे यांच्यात लढत आहे. दोन्ही मतदारसंघात परिवर्तन होणार, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.