नागपूर: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात वाल्मिक कराडसह इतरही अनेक आरोपींचे नाव समोर येत आहे. विरोधी पक्षांकडूनही या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांचेही नाव पुढे आणले जात आहे. या घटनेचे पडसात आता नागपुरातही उमटले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षातर्फे नागपुरात आंदोलन केले गेले.

मध्य नागपुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ चितारओळ, नागपूर येथे हे आंदोलन केले गेले. याप्रसंगी या प्रकरणातील आरोपी क्रूरकर्मा कराड आणि त्यांच्या साथीदारांसह जेही या प्रकरणात सहभागी असतील सगळ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली. शिवसेनाचे जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांच्या नेृतत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानिमित्त आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकविण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आंदोलकांनी याप्रसंगी संतोष देशमुख सारख्या हत्येचे अमानवीय कृत्य करणाऱ्या सर्व नराधमांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणीही यावेळी केली. गोजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अश्या प्रकारच्या अमानवीय व निंदनीय अपराध करणाऱ्या आरोपीच्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज आहे. कठोर शिक्षा झाल्यास पुढे कोणीही या पद्धतीचे कृत्य करण्यासाठी दहावेळा विचार करतील. या प्रकरणातील सगळ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही आंदोलकांकडून याप्रसंगी केली गेली. आंदोलनात गुलामभाई पोठीयावाला, अमित कातुरे, ओमकार पारवे, गणेश डोईफोडे, धीरज फंदी, समीर शिंदे,नीलेश तिघरे,मनिषा पापडकर, अनिता जाधव, मीना जालेकर आणि इतरही शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनासाठी सागर मौंदेकर,धीरज काटे, राजा रामदवार, सलमान खान, सचिन यादव, मनोज गुप्ता, देवेन माहूरकर, अल्पेश शिवनकर, बाल्या मगरे, अजय दहरवाल, राहुल पांडे आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते. कडक कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांकडून दिला गेला. दरम्यान विरोधी पक्षनेत्यांकडून सातत्याने या प्रकरणात राज्याचे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पुढे केले जात आहे. त्यामुळे दबावात आलेल्या मुंडे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. दरम्यान राज्यातील इतरही भागात आता संतोष देशमुख प्रकरण तापले असून हळू- हळू आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे.