नागपूर : दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण भारतातच रावण दहन केले जाते. या रावण दहनामागे, ‘राम हा सत्य आणि जीवनातल्या सगळ्या चांगल्या मूल्यांचे प्रतीक आहे तर रावण हा सगळ्या दुर्गुणांचा आणि असत्याचा प्रतीक आहे’ अशी आख्यायिका सांगितली जाते.
अनेक वर्षांपासून भारतात ही परंपरा सुरू आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून आदिवासींकडून या रावण दहनाला विरोध वाढत चालला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यातून रावण दहन बंद करण्याची मागणी होत आहे. रावण आमचा राजा होता. ते आम दैवत आहे आणि म्हणून त्याचे दहन करणे हा आमच्या संस्कृतीचा अपमान आहे, असे आदिवासी सांगतात.
ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मुनघाटे यांनी रावण आणि आदिवासी यांच्यातील इतिहास उलगडून सांगितला आहे.
तेलुगु लेखक नारला व्यंकटेश राव यांचे ‘सीता जोस्यम’ हे नाटक तेलुगु लेखक नारला व्यंकटेश राव यांच्या ‘सीता जोस्यम’ या नाटकात राम हा दंडकारण्यातील मूळ रहिवाशांचा संहार करतो, तेव्हा अनार्यांचा नेता म्हणून रावण विरोध करतो. या नाटकात सीता नाटकाच्या अखेरीस रामाला म्हणते, ‘या आदिवासींशी आपले कोणतेही वैर नाही. ते आपल्या अध्यात व मध्यात नाहीत. त्यांनी आपल्याला किंचितही अपकार केलेला नाही. मग प्राण्यासारखी त्यांची ही हत्या तुम्ही का करता? ऋषी त्यांचे वर्णन राक्षस म्हणून करतात.
ते प्रथम मलाही खरेच वाटले पण, पुढे जेव्हा इकडे अरण्यात प्रत्यक्ष पाहिले तेव्हा लक्षात आले की, या बिचाऱ्या आदिवासींना पाप-पुण्य कशाची काही कल्पना नाही. न्याय-अन्याय त्यांना काही कळत नाही. आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगावे, एवढीच त्यांची साधी धारणा आहे. तुम्ही कृपा करून माझी विनंती ऐका. ऋषींच्या स्वार्थाकरता त्यांची नाहक हत्या करू नका.’
डॉ. बी. कोलते यांचे ‘महात्मा रावण’हे पुस्तक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. कोलते यांनी १९४९ मध्ये ‘महात्मा रावण’ नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी रामायणातील राम-रावण संघर्ष हा खरा म्हणजे आर्य आणि आर्यतर आर्य आणि द्रविड यांच्यातील संघर्ष आहे असे म्हटले आहे. दंडकारण्य हा द्रविडांचा किंवा ज्या काही आदिवासींचे समूह आहेत त्यांचा प्रदेश होता आणि त्या प्रदेशावर रावणाचे राज्य होते.
उत्तरेकडचे जे काही ऋषी आहेत वैदिक परंपरेतील त्यांना त्यांचा साम्राज्य विस्तार करायचा होता साम्राज्य विस्तार हा राजा करतो, पण राजाचे बरचस काम त्यांचे ऋषी साधू सुद्धा करत असतात. त्यामुळे आपण जर रामायणाचा कथाभाग पाहिला तर आपल्याला अस दिसते की रामाच्या विवाहाच्या पूर्वी राम आणि लक्ष्मण हे दंडकारण्यात आलेले होते. विश्वमित्र या ऋषीच्या सहाय्यार्थ आणि नंतरच्या काळामध्ये लग्नानंतर त्यांना १४ वर्षाचा वनवास मिळाला, हे आपल्याला माहिती आहे
रावण दहन का बंद करायला पाहीजे…
रावण दहन बंद करायला पाहिजे, रावण हा आमचा राजा आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्या समूहांना सारखे मत आहे. अल्पसंख्याकांना सुद्धा महत्त्व आहे. आपण त्यांच्या भावनांचा श्रद्धांचा आणि त्यांच्या प्रथांचा आदर केला पाहिजे आणि यासाठी आपण गांभीर्याने आदिवासींच्या मागणीचा विचार केला पाहिजे, असे ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मुनघाटे सांगतात.