वर्धा : बहुप्रतिक्षित, बहुचर्चित वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे लोकार्पण युवा दिनी म्हणजे १२ जानेवारीला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र हा सोहळा वर्धा की कळंब स्थानकावर घ्यायचा याचा वाद उद्भवला होता. खासदार रामदास तडस हे सोहळा वर्ध्यात घेण्याबाबत आग्रही होते. तर श्रेय घेण्यास उत्सुक काही यवतमाळकर नेते कळंबसाठी हट्ट धरून बसले होते. या वादात शेवटी हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय नागपूर विभागीय रेल प्रशासनाने घेतला. खासदार तडस हे अन्य राज्यात असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र त्यांच्या कार्यालयाने सोहळा रद्द झाला असल्याचे मान्य केले.
युवा दिनी १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्ही.सी.द्वारे मार्ग खुला झाल्याचे जाहीर करणार होते. थेट पंतप्रधान कार्यालयातून या बाबत मध्य रेल्वे प्रशासनाला या विषयी विचारणा झाली. खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयाने यास दुजोरा दिला. या दिवशी खासदार तसेच वर्धा व देवळी येथील तसेच यवतमाळचे आमदार उपस्थित राहू शकतात का, अशी चौकशी झाली. मात्र रेल्वे प्रशासन या दिवशी औपचारिक कार्यक्रम कळंब रेल्वे स्थानकावर तर खासदार वर्धा स्थानकावर कार्यक्रम घेण्याबाबत आग्रही आहे. हा वादाचा मुद्दा आहे. या मर्गाबाबत तडस यांनी सतत पाठपुरावा केला. प्रश्न मार्गी लावला. म्हणून वर्ध्यात सोहळा व्हावा, अशी भूमिका आहे.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठोपाठ अजित पवार यांचेही नागपुरात कार्यालय सुरू
वाद निवळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या मार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वास गेला असून गाड्या डिसेंबर अखेरीस धावायला सुरुवात होईल, अशी शक्यता नागपूर विभागीय रेल्वेचे प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव यांनी चार महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. एकूण २०६ किलोमिटर लांबीचा हा मार्ग साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून पूर्णत्वास जात आहे. वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे व ५ उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. वर्धा ते कळंब या चाळीस किलोमिटर अंतराचे काम पूर्ण झाले असून देवळी रेलस्थानक वास्तू तयार झाली आहे. २००९ मध्ये मंजूर झालेल्या या मार्गाच्या कामास २०१६ मध्ये प्रत्यक्षात सुरुवात झाली.
हेही वाचा – विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, वनरक्षकांची १२५६ पदे भरली जाणार
सध्या वर्धा येथून नांदेडला जाण्यास दहा तास लागतात. पण हा मार्ग सुरू झाल्यानंतर केवळ चार तासांत हे अंतर पार करणे शक्य होणार आहे. विदर्भ व मराठवाड्यास जोडणारा हा मार्ग विकासाचे नवे पर्व सुरू करणार, असा विश्वास तडस यांनी पाहणी वेळी व्यक्त केला होता. लोकार्पण १२ जानेवारीला कुठे होणार हाच उत्सुकतेचा प्रश्न आहे.