वर्धा: रेल्वे प्रवास सर्वांचा आवडता. आरक्षण करण्यासाठी होणारी झुंबड व त्यात होणारा काळाबाजार, सर्वत्र चर्चेत असतो. कारण मार्ग अपुरे, प्रवासी वाढलेले व नव्या गाड्या सुरू करण्याची सोय नाही. कारण, गाड्या धावणार कुठे हा प्रश्न. गाड्या वाढविल्या तर मार्ग नाही, आहे त्याच मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडल्या तर वाहतूक कोंडी व परिणामी गाड्या वेळेवर सुटायची सोय नाही. असाच एक गर्दीचा रेल्वे मार्ग म्हणजे वर्धा भुसावळ. त्यावर तोडगा निघाला आहे. आता नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्याचे सविस्तर विवरण पुढे आले आहे.
भुसावळ-वर्धा मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. हा प्रकल्प भारताच्या रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतुकीसाठी (कार्गो) अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
भुसावळ-वर्धा तिसरी आणि चौथी लाईन (महाराष्ट्र) सुरू होणार आहे. हा प्रकल्प मुंबई-हावरा उच्च घनतेच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या उपक्रमांचा एक भाग आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या आणि मालवाहतूक गाड्यांच्या उच्च मागणीची पूर्तता होईल. या मार्गाची लांबी ३१४ किलोमीटर राहणार आहे. त्याचे मार्गक्रमण जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती आणि वर्धा (महाराष्ट्र) या महत्त्वाच्या भागांतून होणार आहे. यासाठी अंदाजपत्रकीय खर्च ९,१९७ कोटी रुपये अपेक्षित आहे. अपेक्षित पूर्णता कालावधी पाच वर्षे गृहीत धरण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल आणि देशाला अनेक स्तरांवर फायदा होईल, असा दावा करण्यात आला आहे. वाहतूक क्षमतेत वाढ पण होणार. या मार्गावर प्रवाशी आणि मालवाहतूक गाड्यांसाठी अधिक जागा उपलब्ध होईल, ज्यामुळे नवीन गाड्या सुरू करता येतील. आर्थिक कनेक्टिव्हिटी पण साधल्या जाणार. नेहरू पोर्ट, कांडला पोर्ट, मुंद्रा पोर्ट, कोळसा आणि लोहखनिज खाणी, सिमेंट, स्टील आणि ऊर्जा प्रकल्प, यांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांना हा मार्ग जोडणार. मालवाहतुकीत वाढ होणार. यामुळे अतिरिक्त १६.२ दशलक्ष टन मालवाहतुकीची सोय उपलब्ध होईल.
दरवर्षी सुमारे नऊ कोटी लिटर डिझेलची बचत
पर्यावरणाचा लाभ आहेच. दरवर्षी ४५ कोटी किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइडची बचत होईल. म्हणजे सुमारे १.८ कोटी झाडे लावण्याइतके हे काम आहे. दरवर्षी सुमारे ९ कोटी लिटर डिझेलची बचत होईल. लॉजिस्टिक्स खर्च बचत साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा लॉजिस्टिक्स खर्च दरवर्षी १,०१४ कोटी रुपयांनी कमी होईल.
नवीन रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असून वर्षानुवर्षे २ लाईनवर चालणारी रेल्वे वाहतूक ४ लाईनवर चालणार असल्याने रेल्वे सेवेत आमुलाग्र सुधारणा व परिवर्तन घडवून येणार आहे, असे मत रेल्वे समितीचे सदस्य प्रणव जोशी यांनी व्यक्त केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा मोठा अडसर दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय कॅबिनेटने हा बहुप्रलंबित व लोकप्रिय निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रामदास तडस यांचे जोशी यांनी विशेष आभार व्यक्त केले.