-‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान काळाने साधला डाव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत तिरंगा हातात घेऊन चालत असताना हृदयविकाराचा धक्क्याने निधन झालेले नागपूरचे काँग्रेस नेते कृष्णकुमार पांडे ऊर्फ के.के. यांची काँग्रेसचे निष्ठावान सैनिक अशी ओळख होती.

भारत जोडो यात्रेसाठी कृष्णकुमार पांडे नांदेड जिल्ह्यात गेले होते. मंगळवारी सकाळी यात्रा सुरू होताच हाती तिरंगा घेऊन त्यांनी पदयात्रेत भाग घेतला. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते जयराम रमेश व दिग्विजय सिंह चालत होते. काही वेळानंतर पांडे यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यांनी  झेंडा दुसऱ्या कार्यकर्त्याकडे दिला व चालत असताना अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने हॉस्पिटलला पाठवण्यात आले, पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा >>> बुलढाणा: कृषिमंत्री अब्दुल सत्तार ‘बॅकफूट’वर; सिंदखेडराजाचा दौरा केला रद्द, संभाव्य संघर्षही टळला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदव्युत्तर असलेले पांडे यांनी दोन महिन्यापूर्वी पीएचडी प्रवेश परीक्षा दिली होती. महाविद्यालयीन जीवनापासून ते युवक काँग्रेसमध्ये सामील झाले. तो काळ होता १९७५ ते ८० चा. त्यावेळी काँग्रेस पक्ष भरात होता. काँग्रेसचा एक कट्टर कार्यकर्ता असल्याने त्यांना पक्ष संघटनेत विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली. माजी खासदार गेव्ह आवारी नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष असताना पांडे शहर सरचिटणीस होते. त्यानंतर ते सेवादलात सक्रिय झाले. शहर सेवादलाच्या संघटकपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्यासोबत ते आंध्रप्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश सेवादलाचे प्रभारी होते. सध्या ते सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी होते. ते उत्तम वक्ता आणि कुशल संघटक होते. दीड वर्षांपूर्वी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धीरज पांडे याचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांचा त्यांना जबर धक्का बसला होता. त्यातून सावरत त्यांनी नव्या जोमाने सेवादलाचे कार्य सुरू केले होते. कृष्णकुमार पांडे यांच्या शहरात तीन शाळा आहेत. अतिशय शांत, मनमिळावू स्वभाव आणि मितभाषी असलेल्या पांडे कार्यकर्ते व नेत्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या अशा अकाली निधनाने काँग्रेसमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.