scorecardresearch

करोनाग्रस्तांचे मृत्यू रोखणे शक्य! विषाणूमुळे  शरीरातील घटणाऱ्या ऊर्जेवर पुण्यात संशोधन

करोनाची चाचणी करण्यासाठी एक ‘स्वॅब’ घेताना ७१० मिलीयन विषाणू बाहेर निघतात. इतक्या मोठय़ा प्रमाणावर विषाणू शरीरात असतात

करोनाग्रस्तांचे मृत्यू रोखणे शक्य! विषाणूमुळे  शरीरातील घटणाऱ्या ऊर्जेवर पुण्यात संशोधन
शास्त्रज्ञ डॉ. विवेक अंबाडे

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : करोना संसर्गानंतर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. सोबतच सर्दी, खोकल्यामुळे संपूर्ण ऊर्जा बाहेर निघते. यामुळचे अनेकांचा मृत्यू होतो. मात्र, आता शरीरात जाणाऱ्या करोनासारख्या एका विषाणूमुळे किती ऊर्जा कमी होते,  यावरचे संशोधन पुण्याच्या सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक अंबाडे यांनी केले आहे.  

‘एडेनोसिन ट्रायफॉस्फेट’ (एटीपी) हे एक सेंद्रिय संयुग आहे. जे जिवंत पेशींमध्ये स्नायू आकुंचन, मज्जातंतू आवेग प्रसार, कंडेन्सेट विघटन आणि रासायनिक संश्लेषण यासारख्या अनेक प्रक्रियांना ऊर्जा प्रदान करते. मात्र, मानवी शरीरामध्ये  विषाणू गेला की तो सर्वात आधी ‘एडेनोसिन ट्रायफॉस्फेट’ यावर हल्ला करतो व ऊर्जा ताब्यात घेत असतो. त्यामुळे आजारी व्यक्तीने कितीही अन्न खाल्ले तरी ते आधी हा विषाणू भस्म करतो. करोनामध्ये शरीरात गेलेला विषाणू  आधी फुप्फुसावर हल्ला करत होता. त्यामुळे मिळणारे प्राणवायूही तोच खात असे. परिणामी, शरीरात ऊर्जेअभावी मृत्यूचे प्रमाण वाढत होते. हा विषाणू किती ऊर्जा खातो हे कळत नसल्याने त्या प्रमाणात पूरक औषधे देता येत नव्हती.  मात्र,  डॉ. अंबाडे यांनी करोनासारखा विषाणू शरीरातील किती ऊर्जा खातो याचा शोध घेतला आहे. त्यामुळे  करोना झालेल्या व्यक्तीला ऊर्जा पुरवणारी औषधे किती प्रमाणात द्यायला हवी, हे स्पष्ट होणार आहे. 

करोनाची चाचणी करण्यासाठी एक ‘स्वॅब’ घेताना ७१० मिलीयन विषाणू बाहेर निघतात. इतक्या मोठय़ा प्रमाणावर विषाणू शरीरात असतात. हे विषाणू अमिनो अ‍ॅसिडवर हल्ला करतात. त्यामुळेही ऊर्जा कमी होते. या संशोधनामध्ये एक विषाणू कुठल्या प्रकारचा किती अमिनो अ‍ॅसिड घेतो, प्रत्येक अमिनो अ‍ॅसिडची विभागणी आणि एक विषाणूची क्षमता याचा अभ्यास केला. यामुळे आता कुणाला करोना झाल्यास त्याच्या शरीरात असणाऱ्या विषाणूंचा अंदाज घेऊन त्याला बाह्यमाध्यमातून किती प्रमाणात अमिनो अ‍ॅसिड द्यायचे याचा अंदाज येईल.

– डॉ. विवेक अंबादे, शास्त्रज्ञ, जीवशास्त्र विभाग

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 06:29 IST

संबंधित बातम्या