देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

नागपूर : राज्य सरकारला थकीत वीज देयकांची सावकारासारखी बळजबरीने वसुली करायची आहे. म्हणूनच सरकार बाऊ  निर्माण करत आहे. करोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांच्याकडून बळजबरीने वसुली करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी नागपुरात आल्यावर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे विजेच्या देयकाबाबत सादरीकरण केले त्यातून स्पष्ट होते की, त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली आहे. आता सावकाराप्रमाणे महावितरणकडून बळजबरीने वसुली केली जात आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात दिलेल्या निकालानंतर आता निवडणुका जाहीर झाल्यात. त्यामुळे आम्ही त्यास सामोरे जाऊ . मात्र सरकार जे बोलतेय ते कृतीत दिसत नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरकार केवळ आरक्षणाबाबत चर्चा करून केंद्राकडे बोट दाखवत आले आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू द्यायचे नाही, असेही फडणवीस म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाधिवक्ता कुंभकोणी यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण कुंभकोणी यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनीच त्यांची आपल्या अधिकारात नियुक्ती केली, असेही फडणवीस म्हणाले.

नृत्यांगना सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर दरेकरांनी केलेल्या टीकेबाबत चंद्रकांतदादा पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, प्रवीण दरेकर बोलीभाषेत असे बोलले. त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढणे योग्य नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठलेही मुद्दे नाही. त्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहे.