लोकसत्ता टीम

यवतमाळ : निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ व मराठवाडा यांचा प्रकल्पाला असलेला टोकाचा विरोध दुर्लक्षित करून पाटबंधारे विभागाने नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील खंबाळा येथे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम व खडका ते खंबाळा नदीपात्रातून जोडणाऱ्या कच्च्या रपटयाचे काम शुक्रवारी ३ मे रोजी सुरू केले. धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना ही माहिती कळताच शेकडो शेतकऱ्यांनी आज सोमवारी खंबाळा येथे आज धडक देत धरणाचे काम बंद पाडले.

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या आर्थिक तरतुदीमधून पैनगंगा नदीवर बांधण्यात येणारा निम्न पैनगंगा प्रकल्प हा सुरूवातीपासूनच वादात अडकला आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाकडून निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. बुडीत क्षेत्रातील ९५ गावांचा या महत्वाकांक्षी प्रकल्पास तीव्र विरोध आहे. हा विषय न्याय प्रविष्ट आहे. तसेच सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी किनवट व हिंगोली येथील लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराच्या वेळी निम्न पैनगंगा प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल तर आचारसंहिता संपल्यानंतर या संबंधाने बैठक घेण्याची घोषणा केली होती. असे असतानाही खंबाळा हद्दीत आचारसंहिता संपण्यापूर्वीच प्रकल्पासाठी खोदकाम सुरू करण्यात आले. नदी पात्रात गिटटा, मुरूम व दगड टाकून रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे धरण विरोधी संघर्ष समितीने हे काम बंद पाडण्यासाठी आज एकत्र येण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले होते. त्याला प्रतिसाद देत परिसरातील शेतकऱ्यांसह धरण विरोधी संघर्ष समितीचे सदस्य आज सकाळपासूनच प्रकल्पस्थळी खंबाळा येथे मोठ्या संख्येने जमले.

आणखी वाचा-बुलढाणा : लोकसभा निवडणुकीनंतर रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या संख्येत वाढ

सरकार व प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यापूर्वी १२ जुलै २००७ रोजी धरण विरोधी संघर्ष समिती व धरण विरोधक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या काही अधिकारी वर्गाची धिंड काढली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आज खंबाळा येथे चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरण विरोधक व पाटबंधारे विभागात मांडवी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडली. अखेर आचारसंहिता संपेपर्यंत प्रकल्पाचे काम बंदच राहणार असा तात्पूरता तोडगा काढण्यात आला. आंदोलनस्थळी किनवट तहसीलदारांसह विविध अधिकारी ठाण मांडून होते. निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, बंडुसिंग नाईक, प्रल्हाद गावंडे, विजय पाटील राऊत, डॉ. बाबा डाखोरे, डॉ. सुप्रिया गावंडे, गुलाब मेश्राम यांच्यासह शेकडो धरण विरोधक व शेतकरी यावेळी उपस्थित होते.