वर्धा : महाविकास आघाडीतर्फे आज जिल्हा कचेरीसमोर काळी दिवाळी पाळून राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री व राज्य कारभारावर चांगलेच तोंडसूख घेतले. यावेळी आघाडीचे नेते अशोक शिंदे,अतुल वांदिले, शेखर शेंडे, मनोज चांदुरकर, डॉ उदय मेघे, महेंद्र मुनेश्वर प्रवीण हिवरे व अन्य नेते उपस्थित होते. चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करीत आंदोलन सूरू झाले. दोन तास धरणे देण्यात आले.
यावेळी बोलतांना खासदार अमर काळे म्हणाले की आजची उपस्थिती स्पष्ट करते की राज्य सरकारविरोधात किती रोष आहे. आज शांततेत आंदोलन झाले. पण यापुढे शांत राहून जमणार नाही. रस्ता रोको, चक्का जाम असे तीव्र आंदोलन करीत सरकारला जाग आणावी लागेल. काही दिवसापूर्वी नेपाळ येथे लोकांनी संताप व्यक्त केला. खेटर घेऊन सत्ताधिशांना पळवून लावले. भाजप सरकार व मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की नेपाळ सारखे झाले नाही पाहिजे, लोकं तुमच्या मागे खेटर घेऊन धावले नाही पाहिजे तर मागण्या मान्य करा. आम्ही वेगळे काहीच मागत नाही. तुम्ही निवडणुकीत जे आश्वासने दिली होती तीच पूर्ण करा. शेतकरी आत्महत्या वाढत आहे. पण कोणी दखल घेत नाही. निर्लज्जपणा बघायचा असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बघा.
इतका असंवेदनशीलपणा दिसला नाही. रोज आत्महत्या होत आहे पण मुख्यमंत्री म्हणतात की योग्य वेळ येईल तेव्हा कर्जमाफीचा निर्णय घेऊ. मी विचारतो की आणखी किती आत्महत्या मुख्यमंत्र्यांना पाहिजे आहे. ५ हजार, १० हजार, किती पाहिजे. सरकारला जाग आणावी लागेल.एव्हढं निष्क्रिय सरकार बघितले नाही. पुढील काळात स्वस्थ बसून चालणार नाही. आम्ही विरोधक आहोत हे जणू विसरूनच गेलो आहो. रस्ते, पूल, सभागृह बांधून द्या म्हणून लोकं मागणी घेऊन येतात. पण हे सरकारचे काम आहे. माझा खासदार निधी किती पुरणार. म्हणून सरकारला जाब विचारावा लागेल, असे आवाहन खासदार काळे यांनी केले.
यावेळी महाविकास आघाडी नेत्यांनी मागण्या मांडल्या.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ओल्या दुष्काळाच्या पॅकेज मध्ये वाढ, जंगली जनावरापासून होणाऱ्या नुकसानीच्या मदतीत वाढ, सोलर पंपाची सक्ती नं करता सोलर सोबतच इलेक्ट्रिक कनेक्शनचा पर्याय द्यावा, शासकीय कामाची प्रलंबित देयके ठेकेदारांना त्वरित देण्यात यावी, अश्या मागण्या आजच्या आंदोलनातून करण्यात आल्या.