नागपूर : तळकोकणात रेंगाळलेल्या मान्सूनने शुक्रवारी विदर्भातील काही भागांत प्रवेश केला. त्यानंतर शनिवारी तो पुण्यामुंबईतही आला. शनिवारी अलिबागपर्यंत पोहोचलेला मान्सून आता लवकरच म्हणजे येत्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रभर सक्रिय होईल, असा अंदाज मुंबईच्या हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनच्या आगमनामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसाच्या आगमनाने शेतकरी मात्र सुखावला आहे. या पावसामुळे दुबार पेरणीचं संकटही टळले आहे. तळकोकणात आता लावणीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे.

हेही वाचा – यवतमाळ : १४ वर्षीय बालकाने घेतला गळफास, तर १४ महिन्यांच्या बालकाचा टाक्यात बुडून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी रात्रीपासून मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावली. २९ जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपून काढले असून पुढचे ४८ तास महत्त्वाचे आहेत. शनिवारी मुंबईत ११५.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.