मित्राने जादूटोणा केल्यामुळेच व्यवसायात नफा मिळत नसल्याचा गैरसमज झाल्याने तिघांनी मित्राला संपविण्याचा कट रचला. मित्राचे अपहरण करून त्याला पारशिवनी हद्दीतील पालोरा गावाजवळून वाहणाऱ्या पेंच नदीत फेकून दिले. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मंगेश मोतीलाल झलके (३६) गजानननगर, एमआयडीसी, सूरज भाऊराव झाडे (२८) पंचसूत्रा कॉलनी, कपिलनगर आणि अंकित प्रकाश शेवते (३०) रूईगंज, जुनी कामठी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अपहृत नितीन शंकर धमगाये (३९) रा. नागसेनवन हा ठिंबक सिंचन योजनेचे खाजगी काम करतो. त्याला मुलगा आणि पत्नी आहे. पत्नी ही जिल्हाधिकारी कार्यालयात साफसफाईचे काम करते. नितीन आणि आरोपी मंगेश व सूरज हे मित्र आहेत. मंगेशकडे चारचाकी वाहन असून तो भाड्याने देतो. सूरजचे कपड्याचे दुकान असून अंकित हा कर्ज देणाऱ्या कंपनीच्या गाड्या जप्त करण्याचे काम करतो. मागील काही दिवसांपासून मंगेश आणि सूरज यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत नव्हता. त्यामुळे नितीनने जादूटोणा केला असा दोघांनाही संशय होता. नितीनमुळे आपण अडचणीत आलो असून त्याचा काटा काढावा लागेल, असे सांगून त्यांनी नितीनच्या हत्येचा कट रचला.
घरून केले अपहरण
२१ जुलैला दुपारी ३ च्या सुमारास मंगेश, सूरज, अंकित आणि अनोळखी युवक असे चौघेजण दोन दुचाकीवरून नितीनच्या घरी आले. त्यावेळी नितीनचा १७ वर्षीय मुलगा घरीच होता. आरोपींनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. ‘तू केलेल्या जादूटोण्यामुळे माझ्या जिवाला धोका आहे’ असे मंगेश बोलला. त्यावर सूरजने आपण बाहेर कुठेतरी या विषयावर चर्चा करू, असे बोलून नितीनला सोबत घेतले. त्यानंतर तो घरी आलाच नाही. सायंकाळी नितीनची पत्नी स्वाती धमगाये हिने नितीनच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा मोबाईल बंद होता. काहीतरी घातपात झाला आहे, असे लक्षात येताच स्वातीने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली.
नदीत फेकल्याची कबुली
पोलिसांनी मंगेश, सूरज आणि अंकित यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता नितीनला पारशिवनी हद्दीतील पालोरा गावाजवळून वाहणाऱ्या पेंच नदीत फेकल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी रविवारी त्या परिसरात नितीनचा शोध घेतला परंतु, तो मिळून आला नाही. ही माहिती नागपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली. तिघांनाही न्यायालयात हजर करून त्यांची ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी घेतली.