अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या काही महिन्यांपासून लढा पुकारला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांनी अन्नत्याग आंदोलन, पदयात्रेच्या माध्यमातून या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकारने आजवर आश्वासने दिली, पण प्रश्न सुटलेले नाहीत, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, येत्या २२ ऑगस्ट रोजी बैलपोळा हा सण साजरा केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सण मानला जातो. पोळ्याच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी नवीन घोषणा केली आहे. यंदाचा पोळा हा संघर्षाचा आणि कर्जमुक्तीचा पोळा आहे. या पोळ्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्याला बळ देण्यासाठी आपल्या बैलांवर “सातबारा कोरा-कोरा”, शेतकरी कर्जमाफी हवीच, हे घोषवाक्य लिहण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

प्रत्येक गावात, प्रत्येक बैलाच्या जरीवर संघर्षाचा घोष लिहा, आपल्या गावातील सर्व नागरिक, कार्यकर्ते, शेतकरी यांच्याशी याबाबत चर्चा करा, या नव्या संकल्पनेला व्यापक रुप द्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हाच खराखुरा संघर्षाचा पोळा राहणार असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यात १३८ किलोमीटरची पदयात्रा काढली होती. शिवसेना (उद्धव ठाकरे), मनसेसह विविध पक्षांनी या पदयात्रेला पाठिंबा दिला होता.

बच्चू कडू यांनी ज्यावेळी अन्नत्याग आंदोलन केले. त्यावेळी या सरकारने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केलेले नाही. सरकारची आश्वासने फसवी आहेत. सर्व जाती धर्मातील लोकांनी एक व्हा, मत कोणालाही द्या, पण कर्जमाफीसाठी एक व्हा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.

शेतमालाला हमीभाव नाही, मागील कर्ज थकलेले त्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही, सावकारी जाच आणि बँकांच्या नोटिसांचा विळखा, सरकारकडून आश्वासने, पण कृती शून्य यामुळे शेतकरी आज दुहेरी संकटात भरडला जातोय. नैराश्य, अपमान, कुचंबणा आणि शेवटी आत्महत्येची विवशता हाच भाजप सरकारच्या काळातील शेतकऱ्यांचा जीवनक्रम बनलेला आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने कर्जमाफी जाहीर करून दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.