नागपूर : विदर्भातील नागपूर वनविभाग, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर उपाययोजनेसाठी “मार्वल” मार्फत एक विशेष सामंजस्य करारावर नागपूर येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत “मार्वल”चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक(ग्रामीण) डॉ. हर्ष पोद्दार व व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कराराचे आदानप्रदान केले. कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करुन अपघाताचे, गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

या करारांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या भोवताली असलेल्या गावाच्या सीमेवर एकूण तीन हजार १५० कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारलेले हे कॅमेरे लावण्यात येतील. गावाच्या दाट वस्तीच्या ठिकाणी सायरन उभारुन ते वायरलेसद्वारे या कॅमेरांशी जोडले जातील. वाघ, बिबट्या यांना स्वतंत्र ओळखतील असे तंत्रज्ञान या कॅमेऱ्यात असणार आहे. वाघ अथवा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्याबरोबर गावामध्ये या कॅमेऱ्याशी जोडलेले सायरन गावकऱ्यांना सावध करतील. या करारानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात ८७५, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५२५, नवेगाव व्याघ्र प्रकल्पात ६०० तर नागपूर वनक्षेत्रात १ हजार १४५ हे कॅमेरे व सायरन जोडले जातील.

वाघांचे हल्ले शाश्वतरित्या थांबवता यावेत व यात होणारी मनुष्यहानी टाळता यावी यादृष्टीने कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करु असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले होते. याबाबत त्यांनी एक व्यापक बैठक घेऊन या कराराबाबत निर्णय घेतला. संपूर्ण नियोजनानंतर शनिवारी या करारावर स्वाक्षऱ्या करुन लवकर हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनविभाग व मार्वल कंपनीला दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, पेंच व्याघ्रप्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. किशोर मानकर, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक आर. जयराम गौडा, नागपूर वनविभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.