नागपूर : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा थोडी विश्रांती घेतली असली तरीही गणरायाच्या आगमनासोबतच पाऊस पुन्हा परतणार आहे. येत्या २७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे, पण त्याचवेळी मुसळधार पाऊस देखील पुन्हा परतणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ ऑगस्टपासूनच पूर्व भारत आणि लगतच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील सात दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर २५ आणि २६ ऑगस्टला कोकणात खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील ५ दिवसांत गुजरातच्या किनाऱ्यावर आणि महाराष्ट्र किनाऱ्यावर जोरदार पृष्ठभागावरील वारे ४०-५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. पुढील सात दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २६ आणि २७ ऑगस्टला विदर्भ तसेच आजपासून २६ ऑगस्ट दरम्यान ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, २३ ऑगस्टला झारखंड, बिहार. २५ आणि २६ ऑगस्टला ओडिशा आणि २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २६ आणि २७ ऑगस्टला कर्नाटक आणि केरळमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २६ आणि २७ ऑगस्टला कर्नाटकच्या किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत भागात, केरळच्या किनारपट्टीवर आणि २५ आणि २६ ऑगस्टला आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तेलंगणात अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेले चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस झाला. आता या पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. मात्र, इतका पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण होईल असे वाटत असतानाच पाऊस जाताच उकाडा जाणवू लागला आहे.