नागपूर : महापारेषणच्या तुलनेत महावितरण या शासकीय वीज कंपनीत भाड्याने घेतल्या जाणाऱ्या वाहनांचे भाडे खूपच कमी आहे. त्यामुळे कंत्राटदार संतापले आहेत. महावितरणचे पाच वर्षांपासून भाडे न वाढवल्याने ते काम बंद आंदोलनाच्या तयारीत आहेत. पावसाळ्यात आंदोलन झाल्यास वीज यंत्रणेवर परिणामाचा धोका आहे.
वाढते इंधन दर, कामगारांच्या वेतनानुसार महावितरणमधील वाहन पुरवठादारांच्या भाड्याच्या दरात वेळोवेळी वाढ अपेक्षित आहे. परंतु, २७ फेब्रुवारी २०२० नंतर दरात वाढच झालेली नाही. महापारेषणकडून मात्र २०२१ मध्ये दरात सुधारणा केली गेली.
महावितरणमध्ये सुमारे ७०० टॅक्सी तर ७०० टाॅवर लॅडर आहेत. या वाहनांवरील चालक आणि पुरवठादार असे मिळून सुमारे तीन हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह याद्वारे चालतो. ते सर्वच आर्थिक संकटात आले आहेत. त्यामुळे महावितरणने दरवाढ न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा पुरवठादारांनी महावितरणला दिला आहे.
कोणत्या वाहनांची गरज?
ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी वाहने भाड्याने घेतली जातात. राज्यभरातील अधिकाऱ्यांसाठी महावितरण पुरवठादारांकडून टॅक्सी तर वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे टाॅवर लॅडर व इतर वाहने भाड्याने घेत असते.
दर नेमके किती?
महावितरणकडून वर्ग एकच्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी २४ तास भाड्याच्या वाहनासाठी महिन्याला ३५ हजार ७०० रुपये, वर्ग एक दर्जाच्या अधीक्षक अभियंता व मुख्य व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याला ३१ हजार ५०० रुपये, वर्ग दोन दर्जाच्या अधिकाऱ्याला २९ हजार ९०० रुपये, टाॅवर लॅडरसाठी ३७ हजार ३०० रुपये, असे दर ठरवले गेले आहेत. दुसरीकडे महापारेषणमध्ये मात्र वर्ग एकच्या अधिकाऱ्यासाठी महिन्याला ६० हजार रुपये तर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यासाठी ५० हजार रुपये भाडे दिले जाते.
कंत्राटदारांची संघटना काय म्हणते ?
महावितरणला वारंवार दर वाढवण्याची विनंती केल्यावरही न्याय मिळत नाही. त्यामुळे आता नुकसान करून वाहने चालवणे कठीण झाले आहे. तातडीने दर वाढवून द्यावा, अन्यथा हक्कासाठी कामबंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. – योगेश गोमासे, सचिव, नवचेतना टॅक्सी चालक- मालक संघटना, नागपूर.
महावितरणचे अधिकारी काय म्हणतात?
एम.एस.ई.बी. होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले, या विषयाची माहिती नसल्याने प्रतिक्रिया देता येणार नाही. महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत म्हणाले, वाहन भाडेवाढीचे निवेदन संबंधित कंत्राटदारांनी दिले असल्यास त्यावर वरिष्ठ योग्य निर्णय घेतील. ग्राहक अडचणीत येतील असे कुणी काही करू नये.