नागपूर : श्रावण महिना त्यानंतर येणारा गणेशोत्सव, नवरात्र, दसरा हा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा शहरांतील बाजारात मांसाहारप्रेमींची गर्दी वाढू लागली आहे.

ग्राहकांच्या गर्दीमुळे मासे, चिकन आणि मटणण्च्या बाजारात वर्दळ वाढू लागली आहे. चिकन आणि मटण मुबलक प्रमाणात उपलब्ध असली तरी पूर परस्थितीमुळे मासे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे ऐन हंगामात माशांच्या पुरवठ्यात घट झाली असून त्यांच्या किंमतीत वाढल्याचे आढळून येत आहे. तसेच, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने मासळी विक्रेत्यांमधील चिंतेचे वातावरण अद्यापही ‘जैसे थे’च आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून उत्सवांमुळे अनेकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, सण उत्सव संपताच मांसाहारींनी पुन्हा बाजाराकडे धाव घेतली आहे. रविवारपासून बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊसामुळे राज्यातील मच्छीमारांना फटका बसला आहे. परिणामी, मासोळीच्या पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे.

त्यामुळे सध्या मुंबईत बंगाल, आंध्र प्रदेश व गुजरातमधून माशांचा पुरवठा होत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने माशांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

कुठून होते माशांचा पुरवठा

सण उत्सवाचा कालावधी संपल्याने रविवारपासून नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा आदी भागातील मासोळी बाजारपेठांत ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. नागपूरमध्ये माशांचा पुरवठा हा हैद्राबादमधून होतो. मात्र, त्यापेक्षा ग्रामीण भागातून येणाऱ्या मास्यांना अधिक मागणी असते. गोसे प्रकल्प, वैनगंगा नदी यातून येणाऱ्या माशांना जास्त मागणी असते. मात्र, पूर परस्थितीमुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये माशांच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे.

ऑगस्टमध्ये ४०० रुपये किलोने विक्री होणारे मोठे रोवू मासे सध्या ५०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तसेच, मटणच्या दरातही सातशे रुपयांवरून आठशे रुपये वाढ झाली आहे. साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर आणि जानेवारी ते मे हे दोन हंगाम असतात. पहिल्या हंगामात बाजारात प्रचंड प्रमाणात मासे विक्रीसाठी उपलब्ध होतात. परिणामी, मासळी विक्रेत्यांना आर्थिक नफा मिळतो. मात्र, यंदा वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे मासेमारीवर मर्यादा आल्या. त्यामुळे मासोळी व्यवसायावर मोठा परिणाम झाला.

मासांहार सध्याचे दर (१ किलो) ऑगस्टमधील दर
मटण ८०० रुपये ७०० रुपये
चिकन ७०० रुपये ६०० रुपये
रोवू ५०० रुपये ४०० रुपये
कतलस ५०० रुपये ४०० रुपये