नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकी ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंगळवारी प्रभागरचनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार २०१७ प्रमाणे महापालिका निवडणूक ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या नागपूर महापालिकेत ३८ प्रभाग असून, पण ही संख्या ४२ पर्यंत वाढू शकते. अंतिम प्रभाग ३ किंवा ५ सदस्यीय असू शकतो. त्यामुळे आता वाढीव लोकसंख्या, त्यानुसार आरक्षण व प्रभागाचे सिमांकन करण्यात येईल.
प्रभागांची संख्या वाढल्याने प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या सध्या जवळपास ६० हजार आहे, ती वाढून ७० ते ७५ हजार होण्याची शक्यता आहे. ही अधिसूचना “अ” वर्गातील महापालिकांमध्ये नागपूर, पुणे; “ब” वर्ग ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड; आणि “क” वर्ग – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवलीसाठी लागू केली आहे.
राज्य सरकारने मनपा आयुक्तांना अधिसूचना जारी करून प्रारुप प्रभागरचना तयार करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यास सांगितले आहे. आयुक्तांनी मसुदा तयार केल्यानंतर, तो आयोगाकडून मंजूर केला जाईल. त्यानंतर हा प्रारूप प्रसिद्ध करण्यात येईल आणि जनतेकडून सूचना व हरकती मागवण्यात येतील. त्यावर सुनावणी होईल आणि अधिकृत अंतिम प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवतील. अंतिम मंजुरीनंतर ती रचना जनतेसाठी प्रसिद्ध केली जाणार आहे.
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार प्रभाग रचना करताना ती उत्तरेकडून सुरुवात करायचे नमूद केले आहे. त्यामुळे उत्तरेकडून उत्तर-पूर्व त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे पुढे जात शेवट दक्षिणेत करण्याचे स्पष्ट केलेले आहे. प्रभाग क्रमांकाचीही उत्तरेकडून सुरुवात करण्यात येईल. त्यामुळे उपराजधानीतील प्रभागरचना जवळपास यापूर्वीच्या (२०१७) निवडणूक प्रमाणेच असणार आहे, हे निश्चित झाले आहे.
नागपूर महापालिकेची मुदत ४ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून महापालिकेत “प्रशासकराज” आहे. नगरविकास विभागाने प्रभाग रचनेसंदर्भात आदेश काढल्याने चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. रात्री उशिरापर्यंत नगरविकास विभागाचे आदेश महापालिकेत पोहोचले. विविध पक्षांचे कार्यकर्ते व माजी नगरसेवकांमध्ये हे आदेश पोहोचल्याने हालचाली वाढल्या आहेत. आदेश निघाल्याने ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.