नागपूर : भाजप हा शिस्तप्रीय, सुसंस्कृत पक्ष होता. दिवंगत सुषमा स्वराज तर आमच्या हिरो होत्या. दिवंगत अरुण जेटलींसारखे नेते या पक्षात होते. मात्र, आज पक्षप्रवेश देताना या पक्षात ‘क्वॉलिटी कंट्रोल’ राहिले नाही, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. आमच्या पक्षात दर्जा राखून प्रवेश दिला जाईल, असा दावा त्यांनी केला.
भाजपमध्ये गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात इनकमिंग झाले. राष्ट्रवादीत तसे नाही का, असे विचारल्यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, काँग्रेसच्या नेत्यांकडून काही चांगल्या गोष्टी शिकता आल्या. भाजपच्या नेत्यांकडूनही त्या शिकल्या. परंतु, आताचा भाजप व तेथील पक्षप्रवेश हा या पक्षाचा दर्जा घसरत चालल्याचा पुरावा आहे.
हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. या मोर्चात कोण सहभागी होणार हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एक दोन दिवसात सांगतील. सगळया लोकांच्या भावना, इच्छा ऐकून घेणे ही लोकप्रतिनिधींची खरी ताकद असल्याचे त्या म्हणाल्या. सशक्त लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना विनम्रपणे सांगते, त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. त्यामुळे कर्जामाफीसाठीची समिती ही निर्णय घेत नाही. केवळ शिफारस करते. निर्णय सरकारलाच घ्यायचा असतो. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या उद्या ५०-६० टक्के कमी झाली तर आश्चर्य वाटू नये.
मराठीवर मुख्यमंत्र्यांचे एक तर, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वेगळ मत आहे. त्यामुळे हिंदी लादण्यापूर्वी सरकारने याचा विचार करावा. जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात. त्यांच्याकडे प्रवेशाचा अर्ज वगैरे केला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.